चिखली | प्रतिनिधी : चिखली ते जाफ्राबाद मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या झाडांची विनाकारण व कथित अवैध वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी, चिखली तालुक्याच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका उपाध्यक्ष संजय विठ्ठल जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिखली यांच्याकडे २५ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी तक्रार अर्ज साद केला.
तक्रारीत चिखली-जाफ्राबाद मार्गावर कोणतेही रस्त्याचे काम सुरू नसताना तसेच झाडांमुळे कोणताही धोका किंवा अडथळा नसताना वृक्षतोड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित व्यापाऱ्याला किती झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली होती आणि कोणत्या आदेशानुसार वृक्षतोड करण्यात आली, याचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून, हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वृक्षतोडीबाबत खुलासा आणि रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिखली यांनी २५ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज स्वीकारून त्यावर स्वीकृती शिक्का मारला आहे. आता प्रशासन या तक्रारीवर कोणती कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








