सेलू | प्रतिनिधी : सेलू पोलिसांच्या डी.बी. पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल असा एकूण १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
केळझर येथील रहिवासी छाया विलास तडस यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व दोन हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार २ ऑक्टोबर रोजी सेलू पोलिसांत दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार अनिल केकतपुरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत रोशन संजयराव बोरेकर (वय २६) आणि अभिनव किसनाजी देव्हारे, दोघेही रा. वार्ड क्र. ४, केळझर, ता. सेलू, जि. वर्धा यांना १२ तासांच्या आत अटक केली.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल, दोन अँड्रॉईड मोबाईल, दोन हजार रुपये रोख, ५६ सोन्याचे मणी वजन १.९६० ग्रॅम आणि एक सोन्याचे पदक वजन ३.०९० ग्रॅम असा एकूण १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आला. या कामगिरीबद्दल फिर्यादीने सेलू पोलिसांचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल नल्लावार तसेच पोलीस अंमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाने, विनायक गोडे, ओमप्रकाश तल्लारी व लोकेश पवनकर यांनी केली.







