आमदारांनंतर खासदारांकडून पाहणी; ४८ तासांच्या वाहतूक कोंडीनंतर प्रशासनावर वाढला दबाव
सडक अर्जुनी : सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाची खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पाहणी करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ८ ऑक्टोबरपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सौंदड उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दोन दिवसांपूर्वी तब्बल ४८ तास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने हजारो लहान-मोठी वाहने अडकून पडली होती. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
या पार्श्वभूमीवर एका दिवसापूर्वी आमदार राजकुमार बडोले यांनीही उड्डाणपुलाची पाहणी केली होती. त्यांनी NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर जिजकार आणि साइट इन्चार्ज चापले यांच्याशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. उर्वरित त्रुटी तातडीने दूर करून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
त्यानंतर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी पुलावरील अपूर्ण कामे, गटर तसेच इतर आवश्यक कामांची त्यांनी माहिती घेतली. काम दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी उर्वरित कामे पूर्ण करून ८ ऑक्टोबर रोजी उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे आमदार राजकुमार बडोले आणि त्यानंतर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पाहणीनंतर दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, याकडे सौंदड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.










