पैसे भरलेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने सोलर पंप देण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
मालेगाव, ता. ५ | प्रतिनिधी :
मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महावितरण व सोलर योजनेअंतर्गत ओसवाल कंपनीच्या सोलर पंपासाठी आवश्यक रक्कम भरून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप सोलर पंप मिळालेला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असतानाही पंपाअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सोयाबीनच्या नुकसानीनंतर आता तुरीवर संकट
खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. सध्या शेतकऱ्यांची आशा तुरीच्या पिकावर आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यातील कडक उन्हामुळे आणि पाण्याअभावी दुपारच्या वेळी तुरीची पिके कोमेजत असल्याचे चित्र आहे.
येत्या काही दिवसांत पाण्याची व्यवस्था झाली नाही, तर हाताशी आलेले तुरीचे पीकही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सोलर पंपाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सोलर पंपाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
ओसवाल कंपनीच्या सोलर पंपांना मागणी असूनही पैसे भरल्यानंतरही पंप उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कार्यालयीन पातळीवरील दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पंप मिळत नसल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.
तातडीने पंप देण्याची मागणी
वडप आणि परिसरातील शेतकरी वर्गाने या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून, पैसे भरलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने सोलर पंप उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासन आणि संबंधित कंपनीने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पंप उपलब्ध करून देण्यास आणखी विलंब झाल्यास शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले तुरीचे पीक धोक्यात येण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकरी वर्गाकडून देण्यात आला आहे.









