वनहक्क दावे तातडीने दाखल करण्याचे आवाहन; कागदपत्रे, दावा प्रक्रिया व मोजमापाबाबत सविस्तर मार्गदर्शन
एटापल्ली | प्रतिनिधी | दि. ४ ऑक्टोबर २०२६
एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा घेण्यात आली. वनहक्क दावे सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, दावा दाखल करण्याची प्रक्रिया तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दावे प्रभावीपणे कसे तयार करावेत, याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वनहक्काचे दावे अधिक विलंब न करता तातडीने सादर करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मा. उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी वनहक्क दावे सादर करण्यासंदर्भात घेतलेल्या सभेत केलेल्या मार्गदर्शनाची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
बुर्गी इलाक्यातील कांदोळी, गट्टेपल्ली, करपणफुंडी, अबनपल्ली, बिड्री, पैमा, येमली, उडेरा, मरकल आणि बुर्गी परिसरातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वनहक्क दावे दाखल करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले.
मोजमाप व मौका पंचनाम्याचा मुद्दा ऐरणीवर
वनहक्क दाव्यांचे मोजमाप व मौका पंचनामा करण्यासंदर्भात उपवनसंरक्षक, वनविभाग भामरागड यांच्याकडून ६ मार्च २०२५ रोजी आदेश निर्गमित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी मोजमापाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने संबंधित लाभार्थ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
बुर्गी सर्कलमधील संबंधित गावांतील लाभार्थ्यांचे मोजमाप पूर्ण करून घेण्याबाबतही सभेत सविस्तर चर्चा झाली. वनहक्क दाव्यांची प्रक्रिया गतिमान करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची मान्यता मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती
सभेला युवानेते हर्षवर्धनबाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य, अहेरी; लक्ष्मण येर्रावार, अहेरी विधानसभा अध्यक्ष; रामजी कत्तीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य, गडचिरोली; गोसुजी हिचामी, गाव पाटील बुर्गी; सामाजिक कार्यकर्ते विनोद हिचामी, मल्लाजी गावडे व सुगत उराडे; माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर पुंगाटी; वनहक्क समिती बुर्गीचे अध्यक्ष इसुजी माहा; वनहक्क समिती करपणफुंडीचे अध्यक्ष सुरेश मडावी; वनहक्क समिती अबनपल्लीचे अध्यक्ष लालसू गावडे; वनहक्क समिती कांदोळीचे सचिव झुरु मडावी तसेच एस. टी. मांडवकर, क्षेत्र सहाय्यक वनविभाग; आर. पी. गेडाम, वनरक्षक बुर्गी-१; ए. एन. खैरे, वनरक्षक बुर्गी-२, ओनिमा पुंगाटी, सचिव श्रीराम महिला बचत गट बुर्गी; मीनाक्षी डोनारकर, सचिव महालक्ष्मी महिला बचत गट बुर्गी आणि सरिता तलांडी, अध्यक्ष लक्ष्मी महिला बचत गट बुर्गी आदी उपस्थित होते.
सभेला बुर्गी, कांदोळी, करपणफुंडी, मरकलटोला, उडेरा, येमली, अबनपल्ली तसेच परिसरातील मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी वनहक्क दावे सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दावे दाखल करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आयोजक : विनोद हिचामी व सुगत उराडे








