दरेगाव परिसरात पोलिसांकडून ग्रामस्थांसह शोधमोहीम; ड्रोनच्या उड्डाणामागील कारण अद्याप अस्पष्ट
चांदवड : प्रतिनिधी : चांदवड तालुक्यातील काही ग्रामीण भागांत गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. रात्रीच्या अंधारात गावांच्या परिसरात अचानक दिसणाऱ्या या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये कुतूहलासोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे ड्रोन नेमके कुणाचे आहेत, कोणत्या उद्देशाने उडविले जात आहेत आणि रात्रीच्या उड्डाणासाठी त्यांना परवानगी आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
ड्रोनच्या हालचालींबाबत नागरिकांकडून छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असून, त्यावर विविध चर्चांना उधाण आले आहे. ‘ड्रोन कुणाचे?’, ‘रात्रीच का फिरत आहेत?’ आणि ‘कशाचे सर्वेक्षण सुरू आहे?’ असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. काही नागरिक हे ड्रोन सर्वेक्षणासाठी वापरले जात असावेत, असा अंदाज व्यक्त करीत आहेत; मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अपुऱ्या माहितीतून अफवांनाही वाव मिळत आहे.
दरेगाव परिसरात पोलिसांची शोधमोहीम
दरम्यान, या प्रकाराची पोलिसांनी दखल घेतली असून, दरेगाव परिसरात पोलिस पथकाने सुमारे ५० ग्रामस्थांच्या मदतीने ड्रोनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्रोन उंचावर असल्याने त्याचा ठावठिकाणा शोधण्यात अडचणी आल्या. रात्री दहा वाजल्यानंतर ड्रोन दिसणे बंद झाल्याने तो प्रत्यक्षात आढळून आला नाही.
याबाबत पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी सांगितले की, पोलिस पथक ग्रामस्थांसह ड्रोनचा शोध घेत होते; मात्र तो उंचावर असल्याने प्रत्यक्ष शोध घेणे शक्य झाले नाही.
ड्रोन अधिकृत आहेत की अनधिकृत?
गावांच्या परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असतील, तर त्याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडे माहिती आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. संबंधित ड्रोन शासकीय किंवा अधिकृत सर्वेक्षणासाठी वापरले जात असतील, तर संबंधित विभाग कोणता, सर्वेक्षणाचा उद्देश काय आणि त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करणे अपेक्षित आहे.
दुसरीकडे, हे ड्रोन कोणत्याही अधिकृत कामासाठी नसतील, तर त्यांचा शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या घरांच्या व वस्त्यांच्या परिसरातून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याच्या तक्रारी असताना प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘माहिती असेल तर सांगा; नसेल तर शोधा!’
ड्रोन अधिकृत असतील तर नागरिकांना त्याबाबत माहिती देण्यास प्रशासनाला अडचण काय, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाकडे माहिती नसेल तर या हालचालींची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्यास विलंब का होत आहे, असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
रात्रीच्या वेळी ड्रोनच्या हालचाली सुरू असल्याने नागरिकांच्या मनातील संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी तहसील प्रशासन व पोलिस यंत्रणेने संयुक्तपणे चौकशी करणे आवश्यक आहे. ड्रोनची ओळख, त्यांचा वापर करणारी संस्था किंवा व्यक्ती, उड्डाणाचा उद्देश तसेच आवश्यक परवानग्यांबाबत स्पष्ट माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘ड्रोन कुणाचे?’ या प्रश्नाचे अधिकृत उत्तर कधी मिळणार, याकडे आता चांदवड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.










