‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास, शिस्त आणि प्रभावी संवादकौशल्य महत्त्वाचे’ — प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे
मनमाड प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन मविप्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे केंद्रवाहक प्रा. एस. आर. देवढे होते. सूत्रसंचालन जयश्री खोडके यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय ज्योती शेळके यांनी करून दिला. IQAC समन्वयक सी.ए. डॉ. कदम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, प्रभावी संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, शिस्त, नेतृत्वगुण आणि सतत शिकण्याची वृत्ती या बाबी व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुण-दोषांचे आत्मपरीक्षण करून सकारात्मक बदल घडवून आणावेत. केवळ ज्ञान मिळविण्यापेक्षा ज्ञानासोबत कौशल्ये आणि मूल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक तसेच समकालीन विषयांचे व्यापक ज्ञान मिळावे, हा व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे. डॉ. मुकुंदराव रामराव जयकर यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.
यासोबतच संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमाला अशा विविध उपक्रमांचे आयोजन विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.











