नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण; नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
जत | प्रतिनिधी :
जत शहराची ग्रामदेवता आणि महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवी व डोंगरनिवासिनी श्री आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देवीचे दर्शन, आरती आणि जोगवा मागण्यासाठी पहाटेपासूनच महिला भाविकांसह आबालवृद्धांची मंदिर परिसरात रांग लागलेली दिसत आहे.
श्री यल्लमा देवी व श्री आंबाबाई देवी ही दोन्ही देवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची महत्त्वाची केंद्रे मानली जातात. नवसाला पावणाऱ्या देवी म्हणून या देवतांची परिसरात ख्याती आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दोन्ही मंदिरांमध्ये धार्मिक विधी आणि पूजाअर्चा सुरू असून, संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
नवरात्रोत्सवात श्री यल्लमा देवीचे पुजारी सुभाष कोळी व स्वप्नील कोळी पहाटे देवीचा अभिषेक व पूजा करतात. पहाटे पाच वाजता देवीची आरती होते. पूजाविधी सुरू असताना देवीच्या जोगतिणी पारंपरिक गीते गातात. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते.
देवीच्या मूर्तीवरील साडीच्या रंगाशी साधर्म्य असलेल्या रंगांच्या साड्या परिधान करून अनेक महिला भाविक पहाटेच दर्शनासाठी येतात. श्री यल्लमा देवीचे मंदिर जत शहरापासून सुमारे अर्ध्या किलोमीटरवर, तर डोंगरावर वसलेले श्री आंबाबाई देवीचे मंदिर शहरापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे. या दोन्ही देवस्थानांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भाविकांची वर्दळ दिसून येत आहे.
श्री आंबाबाई देवस्थान वनविभागाच्या क्षेत्रात असल्याने परिसरात हिरवाई नटलेली आहे. पावसाळ्यानंतरचे निसर्गसौंदर्य भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
नवरात्रोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ, जत यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंडळाचे पदाधिकारी व सभासद मंदिर परिसरात मुक्कामी राहून देवीचा जागर करतात. दररोज सकाळी साडेसात वाजता श्री आंबाबाई देवीची विविध रूपांत आरती, भजन आणि जोगव्याद्वारे आराधना केली जाते. भाविकांच्या सोयीसाठी जत एसटी आगारातून दररोज सकाळी व सायंकाळी बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.
रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी दुर्गा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी महालक्ष्मी पूजन, कुमारिका पूजन, आतषबाजी, घागरी फुंकणे, दिवटी उत्सव तसेच गोंधळ व जागरणाचे कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा साजरा करण्यात येणार असून, यावेळी नवरात्रोत्थापन, अभिषेक व सालंकृत पूजा होणार आहे.
तसेच सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी देवीची कोजागिरी पौर्णिमा यात्रा होणार आहे. यानिमित्त देवीच्या सहस्रनामावलीचे पठण आणि महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांमुळे जत शहरासह परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.




