“राष्ट्रसंतांची खंजिरी सामाजिक
क्रांती व समाज परिवर्तनाचे प्रतिक “
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दि.११ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या ५८ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (माणिक बंडोजी इंगळे )यांचा जन्म दि.३० एप्रिल १९०९ रोजी यावली, अमरावती,महाराष्ट्र येथे झाला. दि.११ ऑक्टोबर १९६८ ला मोझरी,अमरावती येथे ते पंचतत्वात विलीन झाले. त्यांचे गुरू समर्थ आडकोजी महाराज होतं.
राष्ट्रसंतांची ‘ग्रामगीता’, ‘अनुभव सागर भजननावली’, ‘लहरकी बर्खा’, ‘सेवास्वधर्म’ ही पुस्तके प्रकाशित झालेले आहेत.
गुरुकुंज आश्रमाची स्थापना मोझरी,ता.तिवसा जि.अमरावती येथील सन – १९३५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केली. हा आश्रम अंधश्रद्धा निर्मूलन,जातीभेद निर्मूलन आणि ग्रामविकासाचे एक मुख्य केंद्र बनला आहे. येथील राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राष्ट्रसंत यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला येतात. राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन घेतात आणि विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा लाभ घेतात.
वंदनीय राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दरवर्षी दि.११ ऑक्टोबरला दुपारी ४.५८ वाजता, गुरुकुंज आश्रमात लाखो भाविकांकडून २ मिनिटांची मौन श्रद्धांजली अर्पण केली जाते.
राष्ट्रसंतांच्या खंजिरीचे महत्त्व अनमोल आहे. राष्ट्रसंतांनी आपल्या खंजिरी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन,समता,बंधुता आणि ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश दिलेला आहे. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांना अटकही झाली होती.
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना थोर संत आणि समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केली आहे.राष्ट्रसंतांनी या संस्थेची अधिकृत नोंदणी १९४३ मध्ये गुरुकुंज आश्रम मोझरी, ता.तिवसा,जि.अमरावती येथे केली, तर स्वातंत्र्यानंतर १९५४ मध्ये या मंडळाचा कारभार व्यापक स्तरावर अधिकृतपणे नोंदवला गेला.
राष्ट्रसंतांनी या मंडळाची स्थापना ग्रामीण भागाचा विकास करणे,गावे स्वावलंबी व स्वच्छ बनवणे,समाजातील जातिभेद,अंधश्रद्धा आणि वाईट व्यसनांचे उच्चाटन करणे,खंजिरी भजनांच्या व सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रभावना व नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे, राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या ‘ग्रामगीता’ ग्रंथातील विचारांचा प्रचार करून समाज सुधारणेचा संदेश घराघरांत पोहोचविणे. या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केली होती. या मंडळाच्या माध्यमातून आजही राष्ट्रसंतांचे अनुयायी हे कार्य फार मोठ्या उत्साहाने करीत आहेत.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि समाज प्रबोधनाचा मुख्य कणा म्हणजे त्यांची खंजिरी आणि खंजिरी भजनन होतं.
आजच्या आधुनिक युगातही राष्ट्रसंतांच्या या खंजिरीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे,राष्ट्रसंतांची खंजिरी म्हणजे राष्ट्रसंतांच्या लोकप्रबोधनाचे सर्वात सोपे व प्रभावी माध्यम होते.
राष्ट्रसंतांनी कोणत्याही मोठ्या किंवा महागड्या वाद्यांचा आश्रय न घेता, हातामध्ये सहज मावणारी एक साधी ‘खंजिरी’ घेतली. आजच्या काळात डिजिटल माध्यमांचा सुळसुळाट असला, तरी ग्रामीण भागात थेट मनाला भिडणारे संवाद साधण्यासाठी खंजिरी भजनासारख्या पारंपरिक लोकमाध्यमाची आज खूप गरज आहे,असे मला वाटते .
राष्ट्रसंतांनी खंजिरी भजनातून अंधश्रद्धा आणि कुप्रथांचे निर्मूलन केले.
राष्ट्रसंत म्हणतात,
“तीर्थी धोंडा पाणी।
देव रोकडा सज्जनी ॥
मानसी शुद्धता नाही।
तोची पाषाण निश्चये ॥
भोंदू बाबांचे माहात्म्य वाढविले।
त्यांनी लोकांस भुलविले ॥
अंधश्रद्धेच्या गर्तेत पाडिले। मानवा लावूनिया ॥”
तर देव शोधण्याच्या चुकीच्या पद्धतींवर राष्ट्रसंत म्हणतात की,
“देव शोधू जाता मंदिरी।
देव नाही त्या गाभारी ॥
देव आहे अंतरी।
शोधूनिया पहावे ॥
नाही पोथी-पुराणात।
नाही दगड-धोंड्यात ॥
देव आहे माणसाच्या।
सेवेमध्ये राहिला ॥”
आजही समाजात अशा अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी-परंपरा आणि जातीभेद पाहायला मिळतात. तुकडोजी महाराजांनी त्यांच्या खंजिरीच्या तालावर भजने गाऊन लोकांना जागृत केले आणि समतेचे, स्वच्छतेचे, व्यसनमुक्तीचे आणि विज्ञानाभिमुखतेचे महत्त्व पटवून दिले. आजच्या ग्रामातील व नगरातील तरुणाईला आणि समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या राष्ट्रसंतांच्या खंजिरीची व विचारांची गरज आहे.
राष्ट्रीय एकात्मता,अखंडता, देशप्रेम व राष्ट्रभक्तीची प्रेरणा राष्ट्रसंतांच्या तत्कालीन काळात ज्या खंजिरीतून मिळत होती त्या खंजिरीचा आवाज आजही गावा
गावातच नाही तर शहरा शहरातही घुमला पाहिजे,कारण जुनाट रूढी,परंपरा,हुंडा समस्या, व्यसनाच्या समस्या या फक्त खेड्यातच नाही तर शहरात ही आहेत. फरक एवढाच आहे की,खेड्यातली महिला वटसावित्रीला वडाच्या झाडाची पूजा करून वाडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारते तर शहरातील सुशिक्षित महिला प्लास्टिकच्या वडाच्या झाडाभोवती किंवा कागदावर काढलेल्या वडाच्या झाडाभोवती घरातच फेऱ्या मारताना दिसतात. सुशिक्षितपणा वाढला पण सुसंस्कृतपणा वाढला असे वाटत नाही.त्यासाठी राष्ट्रसंतांच्या खंजिरीतून निघणारा समाजप्रबोधनाचा आवाज हा आजही खेड्यात आणि शहरातही घुमण्याची आवश्यकता आहे .
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात राष्ट्रसंतांनी खंजिरीच्या कडकडाटावर ” पत्थर सारे बॉम्ब बनेंगे
भक्त बनेगी सेना”
सारखी क्रांतीगीते गाऊन इंग्रजांविरुद्ध जनतेला जागे केले होते. आजच्या काळात देशातील अंतर्गत शांतता, एकता आणि तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी जेन झी चे आंदोलन यशस्वी होऊन पेपरफुटी, मत चोरी यासारख्या भारतातील महत्त्वाच्या सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय समस्या नष्ट होण्यासाठी तुकडोजी महाराजांच्या खंजिरीचा नाद नगरानगरात आणि गावागावात घुमलाच पाहिजे. आजच्या ‘जेन झी’ च्या पिढीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची त्यांच्या खंजिरी भजनातील प्रबोधनाची जाण असल्याचे दिसते म्हणूनच ते राष्ट्रसंतांच्या विचारांनीच प्रेरीत झाले आहेत असे वाटते. राष्ट्रसंतांचे विचार केवळ एका काळापुरते मर्यादित नसून ते कोणत्याही युगातील तरुण पिढीला दिशा देणारे आहेत.
आजची तरुण पिढी पर्यावरण, शैक्षणिक आणि सामाजिक हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने करते. तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथातून आणि खंजिरी भजनांतून हेच शिकवले की, केवळ विरोध किंवा संताप व्यक्त करून बदल घडत नाही. आंदोलनाला समाज उभारणीची आणि विधायक कार्याची जोड असणे आवश्यक आहे.
महाराजांच्या ‘खंजिरी भजनाचा नाद’ हा निव्वळ मनोरंजनाचा भाग नव्हता, तर ते जनमानसाला, विशेषतः तरुणांना जागे करण्याचे एक प्रभावी माध्यम होते.आजच्या भाषेत सांगायचे तर, ते त्या काळातील एक ‘स्ट्रीट प्ले’ किंवा ‘सोशल मीडिया कॅम्पेन’ सारखेच होते. तरुणांनी आपल्या कलेचा आणि आवाजाचा वापर समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि जातीभेद नष्ट करण्यासाठी करावा, हा संदेश यातून मिळतो. “गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास” हा राष्ट्रसंतांचा मूळ मंत्र होता. जेन झी अनेकदा जागतिक आणि मोठ्या मुद्द्यांवर बोलतात ते कौतुकास्पद आहे. राष्ट्रसंतांचे विचार त्यांना आपल्या आजूबाजूच्या स्थानिक समस्यांवर, म्हणजेच स्वतःच्या गावांसाठी आणि शहरांसाठी प्रत्यक्ष काम करण्याची प्रेरणा देतात. आजची पिढी समानतेचे समर्थन करते. तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर जात, धर्म आणि पंथ यापलीकडे जाऊन सामूहिक प्रार्थना आणि एकतेचा संदेश दिला. त्यांचे हे विचार तरुणांच्या समतावादी दृष्टिकोनाला अधिक बळकट करू शकतात. जेन झी मधील ऊर्जा,तंत्रज्ञानाची ताकद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शिस्त,राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेच्या विचारांशी जोडल्या जात आहे म्हणूनच तर ही चळवळ अधिक प्रभावी होत आहे.
राष्ट्रसंतांनी ‘ग्रामगीता’ ग्रंथातून गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास हा विचार मांडला. आज शहरे फुगत आहेत आणि गावे ओस पडत आहेत. गावांना स्वयंपूर्ण बनवणे, श्रमप्रतिष्ठा राखणे आणि ग्रामस्वच्छता राखणे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक ठरतात.
आजचे धावपळीचे आणि तणावाचे जीवन पाहता राष्ट्रसंतांच्या खंजिरी भजनातून मिळणारा भक्तीचा आणि आत्मसंयमनाचा संदेश मानवी मनाला शांतता देतो. मूल्यशिक्षण आणि सदाचार रुजवण्यासाठी या वाद्याला आणि त्यामागील विचारांना आज मोठे महत्त्व आहे.
तुकडोजी महाराजांची खंजिरी हे केवळ एक संगीताचे वाद्य नसून ते सामाजिक क्रांती, समाजप्रबोधन आणि समाज परिवर्तनाचे प्रतीक आहे. त्यामुळेच आजच्या काळातही गावोगावी त्याचे महत्त्व अबाधित आहे असे मला वाटते .
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की,
गाव हा विश्वाचा नकाशा ।
गावावरून देशाची परीक्षा ।
गावचि भंगता अवदशा ।
येईल देशा ॥
गाव हा संपूर्ण विश्वाचा एक छोटा नकाशा आहे. गावाच्या स्थितीवरूनच देशाची प्रगती कशी आहे हे ओळखता येते. जर आपली गावेच नष्ट झाली किंवा मागासलेली राहिली, तर संपूर्ण देशाला अवकळा येईल, म्हणूनच तुकडोजीं महाराजांचे विचार व खंजिरी भजनाचा मधुर नाद गावोगावी घुमलाच पाहिजे.
साहित्य माणिक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
काँग्रेस नगर, अमरावती.
भ्र.ध्व.८०८७७४८६०९











