जलजीवन मिशनचे काम अपूर्ण, नागरिकांची पाण्यासाठी वणवण
प्रदीप ताजने
पातुर सर्कल प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील सावरगाव, आलेगाव व गोळेगाव या तीन गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू न केल्यास जिल्हा परिषद, अकोला कार्यालयासमोर मडके फोडो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी आज ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद अकोलाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले असून, त्याच्या प्रती जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या या तीनही गावांमधील विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्यामुळे उपलब्ध पाणी अपुरे पडत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शेतमजूर व सर्वसामान्य कुटुंबांचे हाल होत आहेत.
पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असताना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. जल जीवन मिशन योजनेंतर्गत कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यास वेळ लागणार असल्याने, तोपर्यंत नागरिकांना पाण्याविना वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे कापकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कापकर यांच्या प्रमुख मागण्या –
१. सावरगाव, आलेगाव व गोळेगाव या गावांतील पाणीटंचाईची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करावा.
२. जल जीवन मिशन योजनेतून नियमित पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत तिन्ही गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा.
३. गावनिहाय लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन पुरेशा प्रमाणात टँकर उपलब्ध करून द्यावेत आणि पाणीपुरवठ्याचे नियमित वेळापत्रक निश्चित करावे.
४. टँकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य असल्याची खात्री करून घ्यावी.
५. जल जीवन मिशन योजनेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून प्रत्येक पात्र घरापर्यंत नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा.
६. या मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती अर्जदारास द्यावी.
वरिल मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध न केल्यास, नागरिकांच्या मूलभूत पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद, अकोला कार्यालयासमोर मडके फोडो आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची वेळ व तारीख प्रशासनाला स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.











