१४ व १५ नोव्हेंबरला भंडारदऱ्यात दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन; पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचे मार्गदर्शन
अहिल्यानगर : सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा आणि निसर्गसंपन्न भंडारदऱ्याच्या रमणीय परिसरात पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर घडणार आहे. निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दहाव्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन इकोसिटी, घाटघर, भंडारदरा, ता. अकोले येथे पार पडणार आहे.
मंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रमोद (दादा) मोरे यांच्या पुढाकारातून आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहिबाई पोपेरे राहणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन या संमेलनाला लाभणार आहे. उद्घाटनप्रसंगी लिज्जत पापडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते उपस्थित राहणार असून मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत आडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता नामदेव गिंभिरे, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, सीएसआर प्रमुख संतोष जगधने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.
दोन दिवसांत पर्यावरणविषयक व्याख्याने आणि विचारमंथन
शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी निसर्गभ्रमंती व नाथा कार्यक्रमाने संमेलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा, भोजन आणि पर्यावरणविषयक विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्रा. डॉ. मोहन बी. वामन हे वनस्पती वर्गीकरणशास्त्र, लोकवनस्पतिशास्त्र आणि जैवविविधता संवर्धन या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ बांबू अभ्यासक, संशोधक व लेखक राजेंद्र कुलकर्णी हे बांबू आणि गवतांच्या विविध प्रजातींचा अभ्यास, संशोधन व संवर्धन याविषयी विचार मांडणार आहेत. तसेच कचरू चांभारे हे पर्यावरण संवर्धनातील शिक्षकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. आदिवासी व कातकरी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
निसर्गभ्रमंतीतून सह्याद्रीच्या जैववैभवाचा अनुभव
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी योग व प्राणायामाचे आयोजन करण्यात आले आहे. रानकवी तुकाराम धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या समारोपाचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय सहभागी पर्यावरणप्रेमींना घाटघर, सांदणदरी, अमृतेश्वर मंदिर, परिसरातील धबधबे, भंडारदरा धरण आणि रंधा फॉल यांसारख्या निसर्गरम्य स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक कृतीची गरज
वाढते प्रदूषण, जंगलतोड, पाण्याचे दुर्भिक्ष्य, प्लास्टिकचा वाढता वापर, हवामान बदल आणि जैवविविधतेचा ऱ्हास ही आज मानवजातीसमोरील गंभीर आव्हाने आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. वृक्षसंवर्धन, जलसंधारण, वन्यजीव संरक्षण, प्लास्टिकमुक्त परिसर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा जबाबदारीने वापर या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे.
या संमेलनाच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रातील संशोधक, निसर्गप्रेमी, युवक-युवती, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, वन्यजीवप्रेमी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करण्याची तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची दिशा निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन
‘निसर्गाचे रक्षण हीच भावी पिढ्यांना दिलेली सर्वांत मौल्यवान भेट!’ हा विचार कृतीत उतरवून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ अधिक सक्षम करण्याचा निर्धार या संमेलनातून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील निसर्गप्रेमी, पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, युवक-युवती आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रमोद (दादा) मोरे, कार्याध्यक्ष महेश पाडेकर, श्रीमती छायाताई राजपूत, सचिव वनश्री मोरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, सतीश नेहे, उपाध्यक्ष रामनाथ भोजने, प्रा. डॉ. नानासाहेब गोफणे, राज्य उपाध्यक्ष प्रकाश केदारी आणि संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.









