शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाचे आठवे वर्ष, ४२ व्या टप्प्यात आंदोलन; शेकडो दिव्यांच्या प्रकाशात उजळले रेल्वे रूळ, चिमुकल्यांना फराळ व फटाक्यांचे वाटप
अचलपूर, प्रतिनिधी : शकुंतला रेल्वे सुरू व्हावी आणि तिचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या संघर्षाला यंदाही दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक समरसतेची अनोखी जोड मिळाली. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अचलपूर येथील शकुंतला रेल्वे स्थानकावर शेकडो दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आंदोलनाच्या आठव्या वर्षातील ४२ व्या टप्प्यातील या अनोख्या उपक्रमातून रेल्वे प्रशासन, केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. संघर्षाच्या अंधारात आशेचा एक दिवा प्रज्वलित करण्याबरोबरच सामाजिक एकतेचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
सायंकाळी ४.३० वाजता सामाजिक उपक्रम आणि प्रतीकात्मक अहिंसात्मक जनआंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथणे, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवन बवणेर, प्राचार्य दिनेश मोहोड, शकुंतला रेल बचाव समितीचे मुख्य संघटक योगेश खानझोडे, राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, शारदा उईके, विजय गोंडचवर, दयाराम चांदेले, राजेश पांडे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, रामदास मसने आणि यास्मिन बानो यांच्या हस्ते नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच चिमुकल्या बालगोपालांना फटाक्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
यानंतर माहेर फाउंडेशन आणि जमात-ए-इस्लामी हिंद महिला शक्तीच्या वतीने एकतेचा संदेश देत रेल्वे रुळांवर शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले. विविध धर्म, जाती आणि समाजघटकांतील नागरिकांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा दीपोत्सव सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक ठरला.
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून भारावल्या नगराध्यक्षा
कार्यक्रमानंतर प्रमुख अतिथींनी या अनोख्या सामाजिक आणि अहिंसात्मक आंदोलनाचे कौतुक केले. नगराध्यक्षा रुपाली माथणे यांनी सत्याग्रहींच्या संघर्षाला सलाम करताना सांगितले की, राजकारण आणि समाजकारणात अनेकदा एकमेकांचे पाय ओढण्याची प्रवृत्ती दिसून येते; मात्र जनतेला तुमच्या संघर्षाची किंमत आहे. तुमचे आंदोलन लवकरच यशस्वी होऊन शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, असा अनोखा उपक्रम पाहून आपण स्वतः प्रशासनाचा भाग असलो तरी या निस्वार्थ सत्याग्रहींच्या पाठीशी उभे राहू. शकुंतला रेल्वे ही संपूर्ण परिसरातील जनतेची गरज आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी पवन बवणेर यांनी रेल्वे रुळांवर स्वतःच्या हस्ते दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवात सहभागी होता आल्याचा आनंद व्यक्त केला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य अलौकिक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य दिनेश मोहोड यांनी शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि गोरगरीब नागरिकांसाठी किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व विशद केले. या जनहिताच्या आंदोलनाला आपला नेहमीच पाठिंबा राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
१७ ग्रामपंचायतींचे ठराव; राष्ट्रपतींकडूनही रेल्वे प्रश्नाची दखल
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समितीचे मुख्य संघटक योगेश खानझोडे यांनी शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी परिसरातील १७ ग्रामपंचायतींचे ठराव प्राप्त झाल्याचे सांगितले. याशिवाय अचलपूर नगर परिषदेकडूनही यासंदर्भात ठराव देण्यात येणार असून, विविध सामाजिक संघटनांची संमतीपत्रे समितीला मिळाली आहेत. सन २०२३ मध्ये महामहिम राष्ट्रपतींनीही शकुंतला रेल्वेच्या प्रश्नाची दखल घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
रेल्वे प्रकल्पासाठी निधीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने समितीचे सत्याग्रही लवकरच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, दिल्ली यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. आवश्यक असल्यास राष्ट्रपतींची भेट घेऊन मेळघाटासह चार जिल्ह्यांतील रेल्वे वाहतूक आणि संबंधित समस्यांचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
या दीपोत्सवात माहेर फाउंडेशन, क्रांतीज्योती संघटना, मराठा सेवा संघ, आदिवासी पर्यावरण संघटना आणि जमात-ए-इस्लामी हिंद महिला शक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी यास्मिन बानो, सायरा बानो, नाझिया खान, मेहरा बानो, नाहिरा खान, बेबीताई वजाळे, गंगा दाभाडे, प्रज्ञा नेतनराव, निकिताताई, सीमा वडगावकर, चंद्रकला खंडारे, आशा गवई, मीना ठोसर, भारती पावडे, आचल सरदार, अंजू पाटील, निकिता पाटील, सुवर्णा खंडारे, मनोज पांडे, श्याम ठोसर, आयुष गायकवाड, आदिरा काळे, निर्भय खानझोडे, सौम्या वडस्कर, रोहित नेतनराव, कैलास ठोसर आणि भाविक खानझोडे यांच्यासह शेकडो नागरिक व बालगोपाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वऱ्हाडी कवी राजा धर्माधिकारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपा तायडे यांनी केले.
दिवाळीच्या निमित्ताने शकुंतला रेल्वे स्थानकावर साजरा झालेला हा दीपोत्सव केवळ सणाचा उत्सव नव्हता, तर आठ वर्षांपासून सुरू असलेल्या जनसंघर्षाची जिद्द, सामाजिक समरसता आणि शकुंतला रेल्वेच्या उज्ज्वल भविष्याची आशा व्यक्त करणारा उपक्रम ठरला.










