तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस; तत्कालीन सरपंचावर कारवाई नसल्याने दत्ता जाधव १२ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर उपोषणावर ठाम
चिचोंडी पाटील, प्रतिनिधी : अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीमध्ये बांधकामासाठी ना हरकत दाखला देताना अनियमितता झाल्याची अखेर जिल्हा प्रशासनाने लेखी कबुली दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ता हरिभाऊ जाधव यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने संबंधित प्रकरणाची दखल घेत तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दिली आहे. मात्र, या प्रकरणात तत्कालीन सरपंचावर कोणतीही कारवाई न झाल्याने दत्ता जाधव यांनी नाराजी व्यक्त केली असून, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, अहिल्यानगर कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिचोंडी पाटील येथील संगम चौकात पावन गणेश मंदिर असून, मंदिराशेजारी ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जागा आहे. या जागेवर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गावातील एका व्यक्तीच्या लेखी मागणीनुसार बांधकामासाठी ना हरकत दाखला दिला होता. मात्र, संबंधित व्यक्तीने बांधकामाची अधिकृत परवानगी न घेताच केवळ ना हरकत दाखल्याच्या आधारे दुमजली बांधकाम सुरू केल्याचा आरोप आहे.
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर दुमजली बांधकाम करण्याबाबत तसेच महाराष्ट्र शासनाच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी महसूल विभागाची आवश्यक परवानगी घेण्याबाबत नियमांचे पालन झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. सुरू असलेल्या बांधकामात अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ता हरिभाऊ जाधव यांनी ग्रामपंचायतीकडे संबंधित कागदपत्रांची मागणी केली.
एकाच जावक क्रमांकाचे दोन वेगवेगळे ना हरकत दाखले!
कागदपत्रांची तपासणी करताना एकाच दिवशी एकाच जावक क्रमांकाचे दोन वेगवेगळे ना हरकत दाखले देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा दत्ता जाधव यांनी केला आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदर ठरावासाठी सूचक आणि अनुमोदक म्हणून उल्लेख केलेल्या महिला सदस्यांनी लेखी पत्राद्वारे हा विषय सभेत चर्चेला आलाच नव्हता, तसेच आपण संबंधित ठराव सुचविला किंवा त्याला अनुमोदन दिले नव्हते, असे स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.
या सर्व बाबींची सविस्तर माहिती दत्ता हरिभाऊ जाधव यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर यांना लेखी निवेदनाद्वारे देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी प्रशासनाला स्मरणपत्र दिले. त्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला.
प्रशासनाची कारवाई; मात्र सरपंचावर अद्याप निर्णय नाही!
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत अनियमितता झाल्याचे लेखी कळविले असून, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दिली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन सरपंचांचाही सहभाग असल्याचा आरोप असताना त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, याबाबत दत्ता जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
पंचायत समितीच्या कथित वेळकाढू धोरणामुळे तसेच राजकीय दबावाची शक्यता असल्याने संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि तत्कालीन सरपंच या दोघांवरही नियमानुसार कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, अहिल्यानगर कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील गैरकारभारासंदर्भात आणखी काही गंभीर कागदपत्रे आपल्या हाती लागली असून, तीही पुढील लढ्यात समोर आणणार असल्याचे दत्ता हरिभाऊ जाधव यांनी सांगितले. आता जिल्हा प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई करते, याकडे चिचोंडी पाटील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.











