केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते लोकार्पण; ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार नेत्रोपचार मिळण्यास मदत होणार
मेहकर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे अकोळनेर येथे डॉ. गणेश जाधव यांच्या ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन भारत सरकारचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
उद्घाटनानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संपूर्ण रुग्णालय आणि संशोधन केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रात उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धती, रुग्णांसाठीच्या सुविधा तसेच नेत्ररोगांवरील संशोधनकार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.
ग्रामीण भागातील रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉ. गणेश जाधव यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे ना. प्रतापराव जाधव यांनी विशेष कौतुक केले आणि रुग्णालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्याला अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











