जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज; शिवाजी शिंदे यांचे प्रतिपादन, आरोग्यविषयक मार्गदर्शनासह औषधांचे प्रात्यक्षिक
भांबोरा | प्रतिनिधी :
शेतीचा वाढता खर्च कमी करून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय व जैविक शेतीकडे वळणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य समजून घेऊन माती व पाण्याच्या गुणवत्तेनुसार पिकांचे नियोजन करावे, असे मार्गदर्शन व्हेस्टेज स्टार डायरेक्टर अधिकारी अँग्रोचे श्री. शिवाजी शिंदे यांनी भांबोरा येथे आयोजित कार्यक्रमात केले.
या वेळी शिंदे यांनी गावातील शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माती व पाण्याच्या तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले. शेतातील मातीमध्ये क्षारांचे प्रमाण किती आहे, मातीचा सामू (पीएच) किती आहे, तसेच पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात क्षारांचे प्रमाण किती आहे, याची तपासणी कशी करावी, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. माती आणि पाण्याची गुणवत्ता लक्षात घेऊन शेतीत आवश्यक बदल केल्यास उत्पादनासोबत जमिनीची सुपीकताही टिकविण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात त्यांचे मित्र डॉ. चंद्रकांत मोटे, हेल्थ केअर व आरोग्य आधार केंद्र यांनी मानवी शरीरात होणारे विविध आजार आणि त्यांचे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच काही आयुर्वेदिक औषधांची माहिती देऊन त्यांचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
शेतीमध्ये आधुनिक पद्धतींचा अवलंब करताना जमिनीचे आरोग्य जपणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि सेंद्रिय व जैविक शेतीला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना शेतीत बदल घडवून आणण्यासाठी उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला गावचे सरपंच श्री. राहुल जगताप, प्रफुल भोसले, रावसाहेब बडाभाई लोंढे, माणिकराव लोंढे, अण्णा पठारे, सागर लोंढे, मारुती सुपेकर, राजेंद्र लोंढे यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. शिवाजी शेटे यांनी केले होते.










