मोशी येथील ‘इंजिएक्स्पो’ प्रदर्शनात विविध औद्योगिक यंत्रणा, रोबोटिक्स आणि उत्पादन तंत्रज्ञानाची घेतली माहिती
जुन्नर | वार्ताहर : जय हिंद अभियांत्रिकी महाविद्यालय, कुरण येथील अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने यांत्रिकी अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी तसेच इलेक्ट्रॉनिक्स व संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मोशी येथे आयोजित ‘इंजिएक्स्पो औद्योगिक प्रदर्शनाला’ शैक्षणिक भेट देण्यात आली.
या प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध औद्योगिक कंपन्यांच्या दालनांना भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यामध्ये संगणक नियंत्रित यंत्रे, स्वयंचलित यंत्रणा, रोबोटिक्स तंत्रज्ञान, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, जोडणी यंत्रे, कापणीची आधुनिक साधने, सौरऊर्जा उपकरणे, द्रवदाब व वायुदाबावर चालणाऱ्या यंत्रणा तसेच आधुनिक उत्पादन साधनांची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नवीन तंत्रज्ञान, यंत्रांची कार्यपद्धती, औद्योगिक क्षेत्रातील त्यांचे उपयोग, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि रोजगाराच्या उपलब्ध संधी यांविषयी सविस्तर माहिती घेतली.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष परिचय झाला. महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक कामकाजाशी असलेला संबंध समजून घेण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात व कौशल्यांमध्ये भर पडण्याबरोबरच भविष्यातील करिअरच्या विविध संधींची माहिती मिळाली.
या शैक्षणिक भेटीसाठी जय हिंद शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापन, माननीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे सहकार्य लाभले. अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.










