भारत कवितके या माझ्या मित्राने डोळ्यात पाणी व ओठावर हसू अशा अवस्थेत मंगळवार दिनांक ८ आक्टोंबर २०२४ रोजी आपल्या संघर्षमय जीवनाची ६५ वर्षे पूर्ण केली.सोलापूर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र असलेले पंढरपूर हे त्यांचे जन्मगाव.१९७८ साली १२ आर्टस उर्तीण झाल्यानंतर सोलापूर व पंढरपूर शहरात नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न केला.पण नोकरी मिळाली नाही.खूप मुलाखती दिल्या.पण काही उपयोग झाला नाही.आपला भूतकाळ सांगताना भारत कवितके म्हणतात,” १ नोव्हेंबर १९७९ रोजी पंढरपूर गाव सोडून नोकरीच्या शोधात मुंबई कांदिवली येथे नातेवाईकांच्या मदतीने आलो.वेळ साधारण रात्री ८ ची पंढरपूर एसटी स्थानकावर पंढरपूर मुंबई एसटी उभी होती.
नोकरीसाठी निघालो होतो,काहीसा गोंधळलेल्या अवस्थेत, एसटी मध्ये बसून वर ठेवलेल्या पत्र्याच्या पेटी कडे वारंवार पाहत होतो.त्यात शाळा सोडल्याचा दाखला,जातीचा दाखला, जन्म तारखेचा दाखला, एका वर्तमानपत्राच्या घडी मध्ये दोन दिवसांपासून ठेवलेला होता.खिडकीबाहेर अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आई अप्पांकडे पाहत होतो.जोरजोराने रडावेसे वाटत होते.आपलासा वाटणारा गाव परका होत असल्याची जाणीव होऊन मन उदास, व्याकुळ होत होते.आप्पांनी तिकीट काढून त्या बरोबर दिलेल्या एकेक रुपयांच्या पंधरा नोटा मी विजारीच्या खिशात ठेवल्या.त्यांना मी सारखा सारखा चाचपडत होतो.ती पंधरा रुपयांची रक्कम त्या वेळी फारच मोठी वाटत होती,
तेथूनच माझ्या जीवनाचा संघर्ष मय प्रवास जास्त तीव्र झाला.मी आयुष्यात फार सोसले , अनुभवले,व पचवले.मुंब ई मध्ये आल्यावर अनेक पावसात प्लॅस्टिक कागद डोक्यावर घेऊन रात रात भर बस स्टॉप वर उभे राहून काढल्या.भयानक पडणाऱ्या पावसात मला झोपायला जागा नव्हती.गालावरुन ओघळणाऱ्या पावसाच्या पाण्यात डोळ्यातले पाणी मिसळायचे, पावसात मी रडतोय हे कळायचे नाही.गाव आठवून पोटभरून, मनसोक्त मी रडायचो, कधी कधी कांदिवली रेल्वे स्टेशन च्या चार नंबर प्लॉट फार्मवर भिकाऱ्यांच्या रांगेत झोपून रात्री घालविल्या.
पुढे रेल्वे होमगार्ड च्या नाईट ड्युटीवर मी निरीक्षक अधिकारी म्हणून कर्तव्य करताना माझ्या होमगार्ड ना सांगायचो,अरे बाबांनो पावसाचे दिवस आहेत, भिकारी झोपले असतील तर त्यांना हुसकावून लाऊ नका.कदाचित त्या मध्ये एखादा भारत कवितके असू शकेल.संघर्षमय जीवन जगताना अनेकदा मुंबई सोडून गावी जावे असे वाटायचे पण शेवटी येईल त्या परिस्थितीशी झुंजत लढत राहिलो.गावी लहान पणी दहा पैसे प्रमाणे एक शेणाची पाटी विकण्यासाठी बैलांच्या बाजारात उन्हात अनवाणी फिरताना मीच मला आठवतो, छिद्रे छिद्रे असलेल्या बनियन ला सांभाळून वापरणारा मीच मला आठवतो, लहान पणी उपाशी पोटी अंगणात आकाशातील चांदण्यां मोजता मोजता कंटाळून भूक विसरून झोपी जायचो, स्वप्नात पोटभरून हसायचो,तो मीच मला आठवतो, पंढरपूर मध्ये आषाढी कार्तिकी यात्रेवेळी गोपाळ पूर ते पंढरपूर पर्यंतच्या दर्शन रांगेत लेमन गोळ्या विकणारा मीच मला आठवतो,आज मी स्वतःच्या माझ्या घराच्या खिडकीतून पावसाला पाहतो तेव्हा मागील दिवस आठवतात, नको नको ते दिवस म्हणत अंगावर काटा येतो.पंढरपूर मध्ये असताना मी लेखनाला सुरुवात केली सन १९७९ ला सोलापूर च्या दैनिक संचार मध्ये माझी पहिली कविता बाळा रडू नको ही छापून आली.अफाट आनंद झाला.
ते दैनिक घेऊन मी गावभर सर्वांना दाखवत सुटलो,ओळखीच्याना आणि अनोळखीच्यांना ही.नंतर मी लिखाणात मागे वळून पाहिले नाही,” साहित्यिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ता व गीतकार, माजी होमगार्ड अधिकारी, माजी मनपा कर्मचाऱी असलेल्या माझ्या सृजनशील मित्रास आजपर्यंत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ११५२ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे काही मित्र थट्टेने पुरस्काराचा बादशहा म्हणतात.मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार हे त्यांचे आवडते गायक,सदमा सिनेमातील कमल हसन वर चित्रीत केलेला शेवटच्या प्रसंगाने भारत कवितके खूप भावूक होतात.असे कुणाच्या ही सोबत घडू नये.
१ नोव्हेंबर २०१७ मुंबई महापालिका आरोग्य खाते मधून भारत कवितके सेवा निवृत्त झाले.सेवानिवृती निमित्त आपल्या सहकाऱ्यांना चमचमीत मांसाहारी व शाकाहारी मेजवानी देण्याच्या प्रथेला डावलून भारत कवितके यांनी मुंबई कांदिवली बोरिवली गोराई चारकोप व पंढरपूर या ठिकाणी निराधार,गरिब, अपंग, वृध्द, लोकांना ५०० चादरी चे वाटप केले.त्यांचे सहकारी यामुळे भारावून गेले.त्यांनी भारत कवितके चे कौतुक केले.
पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.सामाजीक कामाची प्रचंड तळमळ असणारे, काही से अबोल पण मनात विचारांची प्रचंड खळबळ असणारे, आपल्याच कार्यात मग्न असलेले भारत कवितके सामाजिक स्तरावर लोकप्रिय आहेत.वयाच्या ५४ वर्षी नोकरी करत असतानाच एम.ए.मराठी प्रथम श्रेणीत भारत कवितके उर्तीण झाले, मुंबई महानगर पालिका यांनी दोन जादा वेतन श्रेणी बक्षीस दिल्या
.असा माझा मित्र भारत कवितके आलेल्या मोठं मोठ्या संकटांना चुटकीसरशी संपवितो,पण कधी कधी जीवनातील आलेला ताण तणाव मुळे सश्यासारखा घाबरतो सुध्दा.त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली असून सर्व च पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.त्याचे आयुष्य उसवताना हे आत्मचरित्र वाचताना डोळे पाणावले जातात.कसे सोसले असतील हे भोग ? हा प्रश्न पडतो.माझ्या या अवलिया मित्राचा मंगळवार दिनांक ८ आक्टोंबर २०२४ ला वाढदिवस साजरा होत आहे.त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
प्रमोद सूर्यवंशी मुंबई.
Discussion about this post