ई- पॉस मशीन आता नेटवर्क अभावी हँग, स्वस्त धान्यासाठी वेटिंगची वाढली रांग..
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ५७ रास्त धान्य दुकानांत ८० हजार लाभार्थी
प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ/ वाल्मीक सूर्यवंशी.
मागील काही दिवसांपासून ई- पॉस मशीनमध्ये नेटवर्क अभावी हँग होण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत असल्याने, शिधापत्रिकाधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार चकरा मारूनही धान्य मिळत नसल्याने कार्डधारकांवर धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पावसामुळे तसेच एनआयसी सर्व्हर मधील समस्येमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय सध्या ई केवायसीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे ई-पॉस मशीनवर अतिरिक्त ताण पडतो आहे.तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून ई-पॉस मशीनद्वारे कार्डधारकांना धान्याचे वितरण केले जाते. ई-पॉस मशीन ऑपरेट करीत असतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यास विलंब होत आहे. तर, स्वस्त धान्य दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे. ई-पास मशीन सुरू होण्याच्या प्रतीक्षेत कार्डधारक स्वस्त धान्य दुकानात तास न तास बसून राहतात.सध्या शेती हंगामाचे काम सुरू असून धान्यासाठी मोलमजुरी सोडून चकरा माराव्या लागत असल्याने, कार्डधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेकजण आपला नंबर जाऊ नये, यासाठी दुकानासमोर रांगेत उभे राहून वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. धान्यापासून वंचित राहणार नसल्याचा दावा केला आहे.
▪दुकानदारावर पडला ई केवायसी प्रक्रियेचा अतिरिक्त ताण..
▪आतापर्यंत फक्त ७ टक्के ई केवायसी झाल्या..
तालुक्यात तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार, तालुक्यात एकूण ५७ रास्त धान्य दुकान आहेत. तसेच तालुक्यात अंत्योदय कार्डधारक संख्या २०१५ असून ९४६८ कुटुंब सदस्य संख्या आहे. प्राधान्य कुटुंब कार्डधारक संख्या १२७४१ असून,५८४१२ कुटुंब सदस्य संख्या आहे. तसेच शेतकरी योजनेतील लाभार्थी कार्ड धारक २८५८ असून १२८४९ कुटुंब सदस्य संख्या आहे. असे एकूण तालुक्यात ८०७२९ लाभार्थी आहेत. आता पर्यंत ७ टक्के ई केवायसी झालेली आहे.
▪ कोणीही कार्डधारक धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न व्हावा..
मागील महिनाभरापासून ई-पॉस मशीन सर्व्हरडाऊनमुळे अकार्यक्षम ठरत आहे. यामुळे धान्य वितरणावर परिणाम होत आहे. यामुळे अनेक कार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले नाही. सोबतच ई केवायसीची कामे सुध्दा रेंगाळत आहे. कोणीही कार्डधारक धान्यपासून वंचित राहू नये.आता जुलै महिन्याचे धान्य मिळाले नाही. वाटप करण्यासाठी मुदतवाढ द्यावी.
सतीश कांबळे, नागरिक
▪जुलैचे रखडलेले वाटप ऑगस्टमध्ये..
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ई पॉस मशीन सर्व्हर प्रॉब्लेम सगळीकडे आहे. पण सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत मशीन सुरळीत चालत आहेत.वाटप सुरू झाले आहे.२ महिन्याचे थांबलेले वाटप एकदाच सुरू आहे. गोपाळ शिंगडे, पुरवठा विभाग तहसील कार्यालय.
Discussion about this post