प्रतिनिधी : यशवंत महाजन (कल्याण)
संपर्क:९९३०७५१२५७
ठाणे जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाची जागा असलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडला. शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सलग दुसऱ्यांदा निवडून देत कल्याण पश्चिमेतील मतदारांनी राजकारणामध्ये नविन अध्याय रचल्याचे दिसून आले. महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 42 हजारांहून अधिक मतांनी आपल्या विजयाची भगवी पताका फडकवली. कल्याणातील जनतेनं विकास करणाऱ्या महायुतीच्या आणि तिच्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्यानेच कल्याण पश्चिमेत हा इतिहास घडल्याची कबुली विश्वनाथ भोईर यांनी आपल्या विजयानंतर दिली.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा गेल्या तीन विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला असता याठिकाणी प्रत्येक वेळी मतदारांनी नविन व्यक्तीच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली होती. त्यामूळे यंदाच्या निवडणुकीत कल्याण पश्चिम कोणाच्या बाजूने कल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यातच निवडणुकीमध्ये प्रथमच 55 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने ही वाढीव मते कोणाला जिंकवतात याची उत्सुकता लागली होती. मात्र कल्याणकारांनी यावेळी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनाच केवळ पसंती दिली नाही तर गेल्या वेळेपेक्षा उच्चांकी मतांनी निवडूनही दिले. तर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, वरुण पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी आपल्याला दर्शविलेल्या पाठिंब्यामुळे मतांचे विभाजन टळले आणि इतक्या मोठ्या मतांनी आपण निवडून आल्याचेही विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच विश्वनाथ भोईर यांनी कायम राखलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम राखली, यावरुनच कल्याण पश्चिमेतील मतदारांनी त्यांना दिलेल्या पसंतीची कल्पना येऊ शकते. विश्वनाथ भोईर यांना 1 लाख 24 हजार 198 इतकी मते, महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांना 81 हजारांहून अधिक मते आणि मनसेचे उल्हास भोईर यांना 21 हजारांहून अधिक मते मिळाली.
दरम्यान विश्वनाथ भोईर यांच्या या दणदणीत विजयानंतर महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा यांनी मोठा जल्लोष केल्याचे दिसून आले. ढोल ताशे, फटाके आणि गुलालाची उधळण करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपला विजय साजरा केला.
Discussion about this post