प्रतिनिधी सुधीर गोखले
राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्क्या घराचे बांधकाम करणे, कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करणे, शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रूपये अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजनेतून दिले जाते. जिल्ह्यातील पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगांव रोड मांगली व सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयाशी, नगरपालिका क्षेत्राकरिता संबंधित मुख्याधिकारी नगरपरिषद/ नगरपंचायत कार्यालयाशी व ग्रामीण क्षेत्राकरिता संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करता येईल. अर्ज करताना जागेचा 7/12 उतारा / मालमत्ता नोंदपत्र / 8 अ उतारा, जातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधारकार्ड, घरपट्टी/ पाणीपट्टी/ वीजबिल इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेतून लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागासाठी व्यक्तीची कमाल उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजार रूपये व शहरी भागासाठी 3 लाख रूपये इतकी आहे.
Discussion about this post