- भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे उपक्रम
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा :– तालुक्यात निवासाला असलेल्या बंजारा समाज बांधवां समवेतच राज्यभरात वास्तव्याला असलेल्या बंजारा उपवर वधू आणि काही कारणांनी घटस्फोटीत, विधवा,विधुर विवाहेच्छुकांसाठी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था यवतमाळ शाखेच्या वतीने या महिन्याच्या शेवटी करण्यात आलेल्या परिचय मेळाव्याला पालकां समवेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सत्यसाई क्रीडा रंजन गृह डॉ.नंदुरकर विद्यालय परिसर दारव्हा रोड यवतमाळ येथे रविवार दि.२९ डिसेंबर रोजी उपरोक्त परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बंजारा समाजातील सर्व शाखीय युवक युवती, घटस्फोटीत, विधवा आणि विधुरांचे परिचय घडवून आणणे आणि विवाह जुळविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संघटनेद्वारे हा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे. नोंदणी परिचय मेळाव्याच्या दिवशीच आयोजनाच्या ठिकाणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
बंजारा समाजातील युवक युवतींना शासकीय आणि खाजगी आस्थापनावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शनाचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आलेले आहे.
बंजारा समाजातील विवाह प्रक्रियेला गती देण्यासाठी सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याने समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपरोक्त कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नवलकिशोर राठोड यांनी केले आहे.
Discussion about this post