मिरज शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा गणेश तलाव हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दुषित पाण्यामुळे सुमारे ६०० किलो मासे मृत्यूमुखी पडल्याने पुन्हा गणेश तलावाचा विषय ऐरणीवर आला आहे. ऐतिहासिक महत्व असलेल्या गणेश तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना जाब विचारला. आहे.
गणेश तलाव सशोभिकरण नावाखाली कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र, गणेश तलावाची दुरावस्था पाहिल्यास हा निधी कोठे खर्च झाला? हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय, गणेश तलावाच्या मालकीवरुन पटवर्धन संस्थानिक आणि महापालिकेत वाद आहे. गणेश तलाव परिसरातील रहिवासी आणि खाद्य पदार्थ विक्रते कचरा टाकत असल्याने तलावाचे पाणी दुषित होऊन वारंवार तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहेत. या परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी मिरज सुधार समितीचे ऍड ए.ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, जहीर मुजावर, नरेश सातपुते, अफजल बुजरुक, राजेंद्र झेंडे, अभिजीत दाणेकर, सलीम खतीब, वसीम सय्यद आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळे आणि सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांची भेट घेत जाब विचारला. गणेश तलावाच्या भोवती १० फुटीचे जाळीचे कंपाउंड करण्यात यावे, स्वच्छतेबाबत स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी, तलावाच्या सुशोभिकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा तसेच, तलावात कचरा टाकणाऱ्या रहिवासी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Discussion about this post