
(ता.प्र) शेख मोईन..
किनवट : सर्वसामान्यांच्या अंधाऱ्या आयुष्याला आपुलकीचा उजेड देणारा प्र’दीप’ सूर्योदयापूर्वीच प्रभातसमी विझला. त्यांच्या पार्थिवावर दहेली तांडा येथे गुरुवारी (ता.2 जानेवारी 2024) सकाळी 11.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तालुक्यातील दहेली तांडा येथील नाईक घराण्यातील प्रदीप हेमसिंग नाईक (जाधव) हे बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर व्यवसायाकडे वळले. त्यांनी आदिलाबाद (तेलंगाणा) येथे कापूस व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. त्यानंतर दहेली तांडा येथील शेतीत पपईची लागवड करून भरघोष उत्त्पन्न मिळविले होते. त्यावेळी पपईवाले ‘भाया’ म्हणून सर्वत्र त्यांची ओळख झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व त्यांनी स्विकारले अन् राजकारणात उडी घेतली. 1999 ला प्रथम त्यांनी किनवट विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना यश आले नाही. म्हणून ते डगमगले नाहीत. पुढे त्यांना शरद पवार यांनी विमुक्त जाती, भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले. तेंव्हा ते महाराष्ट्रभर फिरले. भटक्यांच्या वाडी तांड्यासह पाला पालावर फिरले. त्यांनी पाच वर्षे लोकांत भटकंती केली. विवाह सोहळे असू दे की सुख- दुःखाचे कोणतेही प्रसंग ते जातीने हजर राहत. त्यांचा प्रामाणिक भोळा स्वभाव जाणून जनतेनी त्यांना 2004 पासून सलग तीन टर्म विधानसभेवर निवडून दिले. या काळात त्यांनी अनेक विकासकामे खेचून आणली व केली.
त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली; परंतु त्यांनी दगाबाजी केली नाही. ते राकाँपक्षाचे नेते शरद पवार यांचेशी एकनिष्ठ राहिले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये त्यांच्या पदरी अपयश आलं. तरीही ते जनमानसात वावरतहोतेच. व्यवसायाच्या निमित्तानं ते दक्षिण भारतात हैदराबाद, चेन्नई येथे ये- जा करीत असत. नववर्षाच्या पूर्व संधेला ते हैद्राबादेतच होते. नियतीने त्यांना नववर्ष 2025 चा सूर्य पाहू दिला नाही. बुधवारी (ता. 1 जानेवारी 2025) प्रभातकाळी 5.00 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 69 वर्षाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुली, जावई, मुलगा कपिल नाईक, सून व नातवंडे असा मोठा परिवार असून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती धनलाल नाईक यांचे ते धाकटे बंधू होत.
श्रमिक, शोषित, कष्टकरी, सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अचानक जाण्याने किनवट व माहूर तालुक्यातील राजकारणात कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. ” सारथी महाराष्ट्राचा.च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि..
Discussion about this post