१०६ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
जमिनीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून यामध्ये सुधारणा करण्यासाठी संतुलीत आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. एकाच पीक पद्धतीचा अवलंब करण्याएवजी नवीन पिकाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तूर हे पीक एक चांगला पर्याय असून या पिकाचा शेतकरी बांधवांनी नक्की विचार करावा. तसेच सर्वांना रसायन अवशेषमुक्त अन्न मिळणे देखील गरजेचे आहे. सामाजिक सुरक्षा सोबत अन्न सुरक्षितता येणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रसायन अवशेषमुक्त पीक उत्पादन गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प चे प्रमुख डॉ.सुर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर आणि राष्ट्रीय फर्टीलाईझर्स लिमिटेड (एनएफएल), महाराष्ट्र यांच्याद्वारे दिनांक ०१ जानेवारी,२०२५ रोजी आयोजित १०६ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.पवार यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय फर्टीलाईझर्स लिमिटेड (एनएफएल), महाराष्ट्र चे राज्य व्यवस्थापक श्री.नितीन राहंगडाले, डॉ.अनिता जिंतूरकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे, एनएफएलचे सहायक व्यवस्थापक श्री.एस.पी.पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी सद्य परिस्थितीत पशुधन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. जिंतूरकर म्हणाल्या कि, हिवाळ्यामध्ये पशुधनाच्या हाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम जाणवून येतो. त्यामुळे शारीरिक क्षमता कमी होऊन दुध उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात पशुधनाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पशुधनाच्या शारीरिक गरजा ओळखून त्याप्रमाणे संतुलित आहार व्यवस्थापन आवश्यक आहे. तसेच उन्हाळ्यातील चारा नियोजांसाठी प्रत्येक पशुपालकाचे मुरघास तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.

यावेळी आंबा मोहोर व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.भावर म्हणाले कि, आंबा मोहोर व्यवस्थापणासाठी पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ९ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे पहिली फवारणी घ्यावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते. बोंगे फुटताना दुसरी फवारणी लॅम्ब्डा सायहेलोथ्रीन ५ टक्के ६ मिली प्रति १० लिटर पाणी याची घ्यावी. या फवारणीमध्ये भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. तिसरी फवारणी हि दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ०३ मिली किंवा व्युफ्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे घ्यावी. चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने थायोमेथॉक्झाम २५ टक्के (WDG) १ ग्रॅम तर पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ०६ मिली तर सहावी फवारणी (पाचव्या फवारणीनंतर गरज असल्यास १५ दिवसांच्या अंतराने) पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.
यावेळी श्री.एस.पी.पाटील यांनी राष्ट्रीय फर्टीलाईझर्स लिमिटेड चे विविध उपक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना एनएफएल मार्फत पीएसबी द्रवरूप संघाचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केव्हीकेद्वारे राबण्यात येणारे उपक्रमाबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.सतीश कदम,श्री.जयदेव सिंगल, श्री. शिवा काजळे, श्री.जयदीप बनसोडे यांनी नियोजन केले.
Discussion about this post