लाडक्या बहिणी हिरमुसल्या, तरीही समाधान, दोन महिने पाहावी लागणार वाट
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेचा चौथा हप्ता राज्य सरकारने बुधवार (दि. 25) डिसेंबर पासून खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली. निवडणुकीत 2100 रुपयांचे आश्वासन दिलेल्या भावाने सत्तेवर येताच केवळ दीड हजारांवर बोळवण केल्याने बहिणी हिरमुसल्या आहेत. दरम्यान, बजेट सादरीकरणानंतर मात्र आश्वासनाची पूर्तता करण्याचे सरकारने यापूर्वीच जाहीर केले. यामुळे बहिणींना आता कधी एकदा बजेट सादर होईल असे झाले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील बहिणींना आपल्याकडे
आकर्षित करण्यासाठी नामी शक्कल लढवत दरमहा दीड हजार रुपयांची घोषणा करत सन्मान निधी सुरू केला. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच सरकारने नोव्हेंबरपर्यंचे सर्व हप्ते खात्यात जमा केले. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर विधानसभा निवडणुका घोषित झाल्या. त्यादरम्यान सत्ताधाऱ्यांसह इतर पक्षांनीसुध्दा आम्ही सत्तेवर आलो तर 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. यामुळे महिलांनी सत्ताधारी पक्षांना भरभरून मतदान करत सत्तेची पुन्हा संधी दिली. यामुळे लाडक्या बहिणींना अपेक्षा होती ती एकवीशे रुपयांची मात्र बजेटचे कारण देत सरकारने आता पूर्वीचीच रक्कम म्हणजे पंधराशे रुपये देण्यास सुरुवात केली आहे. जिथे एकवीशे रुपयांची अपेक्षा होती तिथे पंधराशे रुपये जमा होत असल्याने लाडक्या बहिणी मात्र काहीशा हिरमुसल्याचे दिसून येत आहे.
अडचणीच्या काळात हातभार
सध्या शेतकरी वर्ग अडचणीत असल्यामुळे घरात पैशाची चणचण भासत आहे. गोंडऊमरी परिसरातील गोंडऊमरी, निलज, वांगी, बोळदे, सालई, पळसगाव, महालगाव, वळद आदी गावातील महिलांनी खात्यावर पैसे पडताच बँकेत गर्दी केल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील महिला वर्गाला शेतीत राबावं लागतं. मात्र शेती सध्या तोटयात चालली आहे. शेतमालही बेभाव विकावा लागत आहे. शेतात राबून मालकालाच काही उरत नाही तर मालकीणीला काय मिळणार म्हणून लाडक्या बहीण योजनेचा आधार मिळत असल्यामुळे लाडकी बहीण दुधाची तहान ताकावर भागवत आहे. आता पंधराशे मिळाले मात्र मार्चमध्ये एकवीशे मिळतील अशी आशा आहे.
बहिणींच्या नजरा बजेटकडे
दरम्यान, राज्यात आगामी काळात सादर होणाऱ्या बजेटकडे आता बहिणींचे लक्ष लागले आहे. कारण, बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर एकवीशे रुपये मिळणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे कधी एकदा बजेट सादर होईल अन् कधी वाढीव सन्मान निधी मिळेल अशी उत्सुकता बहिणींना लागली आहे.
आज ना उद्या मिळतीलच
सरकारने आपले वचन पाळले आहे. लाडक्या बहिणींना नाराज न करता सर्वच बहिणींच्या खात्यावर आता पैसे जमा होत आहेत. आज दीड हजार मिळाले तर उद्या एकवीशे मिळतीलच. त्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही.

— बबिता मोटघरे, गोंडउमरी.
अडचणीत दिलासा
सध्या शेती तोट्यात आहे. त्यामुळे हातात पैसा नाही. शिवाय पुढच्या महिन्यात संक्रांतीचा सण आहे. यामुळे भावाकडून मिळालेले पंधराशे रुपये म्हणजे संसाराला तेवढाच
हातभार लागेल.

— वर्षा दोनोडे
Discussion about this post