
प्रा. दिलीप नाईकवाड..
सिंदखेडराजा ( तालुका प्रतिनिधी)
सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या
साखरखेर्डा येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सुमनताई जगताप लवकरच पाय उतार होणार असून ठरल्याप्रमाणे आज राजीनामा देणार आहेत.आपल्या दोन वर्ष ९ महिन्याच्या कारकिर्दीत त्यांनी उपसरपंच सैय्यद रफिक व सदस्यांना सोबत घेऊन
गावात अनेक विकासात्मक कामे करून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
येथील सरपंच सुमनताई जगताप ह्या आपल्या सरपंच पदाचा राजीनामा मंगळवार ता.११ रोजी गटविकास अधिकारी यांना सादर करणार आहेत . दोन वर्ष ९ महिने त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार व्यवस्थित सांभाळीत अनेक विकासात्मक कामे करुन एक विकासाचे व्हिजन दिले आहे . त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून दबाव येत असून जनतेतून मागणी होत असली तरी ठरलेल्या कालावधीची पुर्तता म्हणून त्या राजीनामा देत आहेत . तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्य असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीची निवडणूक फेब्रुवारी २१ मध्ये झाली होती . त्यावेळी भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी करून शिवसेना प्रणित शिवसेना नेते रविंद्र पाटील यांच्या पॅनलला लढत दिली होती . त्यात राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा १६ विरूद्ध १ ने विजय होऊन आघाडीचे १६ सदस्य निवडून आले होते . सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असता पहिले एक वर्ष मला मिळावे म्हणून राष्ट्रवादी चे सदस्य दाऊद कुरेशी यांनी हट्ट धरला . डॉ राजेंद्र शिंगणे त्यावेळी पालक मंत्री असल्याने त्यांनी दाऊद कुरेशी यांना हिरवी झेंडी दिली आणि दाऊद कुरेशी च्या गळ्यात सरपंच पदांची माळ पडली. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी दाऊद कुरेशी यांनी कारभार हाती घेतला . त्यांनी आपला कार्यकाल एक वर्षा ऐवजी चक्क दिड वर्ष पर्यंत लांबविला. ठरल्याप्रमाणे दाऊद कुरेशी यांनी राजीनामा दिल्यानंतर माळी समाजाला प्राधान्य देण्याच्या हेतूने
सुमनताई सुनील जगताप यांना संधी मिळाली व २७ जून २२ रोजी त्यांनी सरपंच पदाचा कार्यभार हाती घेतला . आपल्या २ वर्षापेक्षा जास्त कारकीर्दीत गावातील रस्ते , भुमिगत नाली , पाणीपुरवठा अशी विकासात्मक कामे करुन जनतेची मने जिंकली . त्यांनी केलेल्या सहकाराच्या माध्यमातून गावातील नागरिकांनी राजीनामा देऊ नये आणि सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण करावा अशी मागणी अनेकांनी त्यांच्याकडे केली . परंतू राजकीय समीकरणे लक्षात घेऊन त्यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे . त्यांच्या नंतर कोण सरपंच होणार ही नावे गुलदस्त्यात असली तरी माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे सांगितलं तोच सरपंच पदासाठी अर्ज दाखल करेल हे निश्चित आहे . १६ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये अनेकांना सरपंच व्हावे असे वाटत असले तरी येणारी रंगपंचमी कोणाला गुलालाने रंगविते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.मात्र यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार असली तरी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव हे जो निर्णय घेतील तेच सरपंचपदी विराजमान होतील अशी शक्यता आहे.
ग्रामविकासाला प्राधान्य देऊन गावातील सर्वच वार्डात विकासात्मक कामे केली.मात्र ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे..
Discussion about this post