कोल्हापूर:- जीवनात अयशस्वी झाल्यावर नशिबाला दोष देण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर वाचनातून ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकाशी व ग्रंथाशी मैत्री केली पाहिजे. अध्ययनात उत्तम गुणाबरोबर विद्यार्थ्यांनी कौशल्ये व ज्ञान आत्मसात करण्यासाठी तसेच विविध भाषा शिकण्यासाठी व बोलण्यासाठी वाचनाची कला जोपासली पाहिजे. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन युवापिढी ध्येयशून्य बनत आहे. ज्ञानांनी समृद्ध असणाऱ्या व्यक्तीनीच समाजात सर्वोच्च शिखरावर स्थान प्राप्त केले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी केले.
येथील ऐतिहासिक समृद्ध वारसा असलेल्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे हे उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बी.पी.माळवे, प्रा. बी.टी. यादव यांच्या सहित प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.
अभ्यासा व्यतिरिक्त काही न वाचता परीक्षा पद्धतीतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याची खंत व्यक्त करत समीर देशपांडे म्हणाले की, संवेदना जीवंत ठेवण्याचे कार्य पुस्तके करतात. व्यक्तीचे अनुभवविश्व व भावविश्व वाचनामुळे समृद्ध होत असते. इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांनी वाचनाची कास धरली पाहिजे व कसदार ग्रंथांचे वाचन केले पाहिजे, त्याशिवाय खरे शिक्षण मिळणार नाही.
पुस्तकांची संगत आपल्याला बरेच काही देवून जाते म्हणून पुस्तकांची मैत्री केली पाहिजे असे सांगत समीर देशपांडे यांनी मृत्युंजय कार शिवाजी सावंत सारखे लेखक या प्रशालेत होते याचा विद्यार्थ्यांनी वारसा जोपासला पाहिजे. वाचन, मनन, चिंतन, परिश्रम, अभ्यास या पंचसूत्रीच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होता येते, यासाठी विद्यार्थ्यांनी वाचण्याची कला अंगीकृत केली पाहिजे असे समीर देशपांडे यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ गजानन खाडे म्हणाले की, कोल्हापूरच्या मातीतून अनेक व्यक्तिमत्वे घडलेली आहेत याचा विद्यार्थ्यांनी वारसा जोपासवा. व्यक्तिमत्त्वाच्या परिपूर्ण विकासासाठी विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. दरमहा किमान दोन अभ्यासेत्तर पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत. संकल्प करून जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन केले पाहिजे. वाढदिवस साजरा करताना अथवा एखाद्याचे कौतुकपर सत्कार करताना विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ न देता वेग वेगळी पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी उपस्थितांना करीत महाराष्ट्रातील वाचन चळवळ या उपक्रमात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाच्या वेळी गुलाबाचे रोप, शाल याबरोबर ग्रंथ देऊन प्रशालेचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.बी.पी.माळवे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, यांनी आभार मानले. प्रा. सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
Discussion about this post