शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे : मकरसंक्रांतीला आणखी काही दिवस बाकी आहेत. मात्र मकर संक्रांतीची चाहूल लागताच पतंगीचा मोसम सुरू झाला असून ठिकठिकाणी आतापासूनच पतंग उडविण्याचा आनंद घेताना मुले व तरुण दिसत आहेत. परंतु पतंगबाजी करताना घातक अशा नायलॉन मंजाचा वापर पशुपक्षी, प्राणी व मानवी जीवनासाठी घातक ठरत आहे.
पूर्वीपासूनच पतंग उडविण्याचा मोह लहानपणापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. चौकात पतंगांची दुकानं लागली, की लहानपणीचे पतंगाचे दिवस आठवतात. तेव्हा दुकानातून कुणीही पतंग विकत आणत नसे. घरीच पतंग तयार केली जात होती. रंगीत कागदांचे ताव आणायचे. बुरूड गल्लीतून कामट्या आणायच्या. चाकूनं त्या तासायच्या. उभी काडी जाड. धनुष्यासारखी वाकवायची काडी बारीक तासायची. काड्या चिकटवायला शिजवलेल्या भाताची शितं वापरायची. काटाकाटी करताना पतंग फाटू नये म्हणून चारही काठांना दोर लावून तावाचे काठ दुमडून चिकटवायचे. पतंग तयार झाला, की महत्त्वाचं काम म्हणजे सुत्तर बांधायचे. वरून-खालून चार चार बोटं सोडून एक वीत मोजायचं आणि उभ्या काडीच्या उजव्या डाव्या बाजूला छिद्रं पाडायची. त्यात दोरा ओवायचा. दोऱ्यासकट पतंग उचलन हातावर बॅलन्स करून मग गाठ मारायची, की झाला पतंग तयार.
मांजा तयार करणं म्हणजे मोठं प्रकरण असे. अंगणात तीन दगडांची चूल मांडून काटक्या गोळा करून त्या पेटवून भांड्यात पाणी टाकून सरस वितळवायला ठेवायचा. तो नाही मिळाला तर साबुदाणा पाण्यात उकळायचा. दोरा दाभणात ओवून बाहेर काढायचा. ती दाभण एकानं धरायची. तो दोरा लाल रंगाच्या डब्यातून बाहेर काढायचा. अंगणात भिंतींना खिळे ठोकून दोरा ताणून वाळवायचा. तोपर्यंत सोडा वॉटरच्या बाटल्या दगडावर बारीक कुटायच्या. चाळून घ्यायच्या. तो चुरा सरसात मिसळून दोन्ही हातांवर घ्यायचा. ताठलेल्या दोऱ्या मुठीमध्ये धरून एकेक पाऊल हलकेच पुढं टाकत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात मांजा लावायचा. वाळला, की त्यावर दसरं तिसरं पट लावायचं. मांजा तयार झाला, की तो चक्रीला गुंडाळायचा. पतंग उडवताना दुसरा मुलगा ती चक्री दोन्ही हातांत धरायचा. दुसरी एक चक्री होती आसारी. ती एका हातात धरायची आणि दुसऱ्या हातानं पतंग उडवायचा. गावगाड्यात मैदानात नाही तर उंच भागावर जाऊन पतंग उडविला जात असे .जुनी घरं एकमेकांना लागून असायची. झाडेही मोठमोठी असायची. कटलेला पतंग खाली यायला लागला, एका घरावरून दुसऱ्या घरावर चढून पकडायला मजा यायची.
वरच्यावर पतंग पकडण्यासाठी बांबूला फांदी लावायची किंवा बाभळीची फांदीच वापरायची. एखादा कटला, की मैदान किंवा रस्त्यावरची पोरं व्हयकाप्या करून जोरात ओरडत. कटलेला पतंग पकडला, की काहीतरी मोठा पराक्रम केल्यासारखं वाटे. पतंग पकडता आला नाही तर दुसऱ्यानं पकडलेला पतंग फाडून टाकण्याची प्रथा होती. मग जोरदार भांडणं, मारामाऱ्या. जन्माचं वैर. रेडिओ सिलोनवर पतंगाच्या दिवसांत ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ हे गाणं हमखास लागायचं आणि नागपूर आकाशवाणी वर आशा भोसलेंचं ‘चढाओढीनं चढवत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते’ हेही गाणं ठरलेलं. आताच्या मुलांना पन्नास रुपयांचा पतंग आणि त्याला चिनी मांजा लावून मैदानात जाऊन एकट्यानं पतंग उडवावा लागतो. काय मजा येत असेल माहीत नाही. ग्रामीण भागात आजही पतंगाला नायलॉन मांजा नसतोच. मात्र नायलॉन मांजाने पतंग उडविणे जीवघेणा ठरू शकते. सोबत संक्रांतीला पतंग जपूनच उडवावी, मांजाच्या स्पर्शाने विद्युत प्रवाहाचा धोका होण्याची शक्यता आहे.
पतंग उडविताना ‘ही’ घ्या काळजी
वीज तारांवर अडकलेली पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते. तारांमध्ये अडकलेला मांज्या ओढू नये. अडकलेली पतंग किंवा मांज्या काढायला रोहित्रावर चढू नये. धातुमिश्रित अथवा नायलॉनचा मांजा टाळावा, वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा. तारांत अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये. पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष द्यावे. वाहन चालकांनीही घ्यावी काळजी.
Discussion about this post