प्रतिनिधी:- शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: मुलींची शाळेतील उपस्थिती वाढावी यासाठी सन 1992 मध्ये म्हणजेच 32 वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शाळेत उपस्थित विद्यार्थिनींना प्रतिदिन 1 रुपया दैनिक भत्ता सुरू केला होता. मात्र 32 वर्षात या भत्त्यात एक दमडीचीही वाढ झालेली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू केलेल्या या योजनेला अनेक वर्षापासून घरघर आहे.
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना दरमहा घसघशीत मदत मिळते. पण, ही सावित्रीची लेक मात्र राज्यकर्त्यांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. दरम्यान, आता शिक्षण विभागाने दैनिक भत्त्यात 5 रुपये देण्याबाबत हालचाली सुरू केल्या असून, किती खर्च वाढेल याची माहिती मागविली जात असल्याचे कळते. 32 वर्षांपासून इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलींना प्रतिदिन एक रुपये भत्ता दिला जात आहे.
या 32 वर्षांच्या कालावधीत एक रुपयाची वाढ करण्याची मानसिकता सरकारने एकदाही दाखविलेली नाही. या कालावधीत सर्वच पक्षाचे सरकार येऊन गेलेले आहे. मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी चळवळ उभारली आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याच पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात राज्याच्या शिक्षण विभागाकडून सावित्रीच्या लेकींची ही एकप्रकारे थट्टाच सुरू आहे.
एकीकडे भारतातील इतर राज्यात शिक्षणावर मोठा खर्च होतो, परंतु महाराष्ट्रात मात्र शिक्षणाबाबत कमालीची उदासीनता जाणवते. ‘शिकलेली आई, घरदार पुढे नाही’ असे स्लोगन केवळ भिंतीवर रंगवले जातात. परंतु, प्रत्यक्षात शालेय विद्यार्थिनीही भविष्यात आई आहे आणि ती जर शिकली तर तिचं संपूर्ण कुटुंब किंबहुना संपूर्ण समाज प्रगतिपथावर जाईल. ही वस्तुस्थिती असताना शिक्षणाबद्दलची असलेली ही कमालीची उदासीनता मन सुन्न करणारी आहे.
महागाई वाढली, पण…
गेल्या 32 वर्षात महागाई कितीतरी पटीने वाढली. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच लोकप्रतिनिधींच्या वेतन आणि भत्त्यातही वाढ झाली. परंतु, 32 वर्षांत गरीब विद्यार्थिनींच्या भत्त्यात एका छदामाची वाढ केली नाही. विशेष म्हणजे, तो वेळेवरही मिळत नसल्याचेच विदारक चित्र आहे.
Discussion about this post