जानेवारी चा महिना ! चीन मध्ये एका नव्या विषाणूच्या उद्रेकाची सुरुवात झालीये !! उर्वरित जग त्याच्याकडे भीतीयुक्त नजरेने बघत आहे !!! हा विषाणू जर आपल्या देशात आलाच तर त्याच्या अटकाव कसा करायचा या विषयी प्रशासनाच्या उच्च पातळीवर हालचाली सुद्धा सुरु झाल्या आहेत !!!!
वरील वाक्ये वाचून जर हि पोस्ट भूतकाळातील 2020 ‘कोरोना व्हायरस’ विषयी आहे असे जर आपल्याला वाटले असेल तर हा समज चुकीचा आहे, होय! 2025 उजाडता-उजाडता परत एकदा 2020 च्या कहाणीची पुनरावृत्ती सुरु होतेय कि काय अशी आशंका आता जगाला भेडसावू लागली आहे आणि याचे कारण आहे ते म्हणजे जिथे कोव्हीड-19 विषाणू चा उगम झाला त्याच चीन च्या उत्तर भागात मध्ये परत एकदा HPMV (Human Metapneumovirus) या नव्या व्हायरस चा उद्रेक सुरु झाला आहे, श्वसनाशी संबंधित आजार निर्माण करू शकणाऱ्या HPMV विषाणू च्या संसर्गाने चीन च्या उत्तरी क्षेत्रातील इस्पितळे परत एकदा ओसंडून वाहू लागली आहेत.
खोकला, ताप, नाक चोंदणे आणि धाप लागणे हि या HPMV विषाणू संसर्गाची मुख्य लक्षणे आहेत विशेष म्हणजे कोव्हीड-19 विषाणू प्रमाणेच हा विषाणू ‘मनुष्या पासून मनुष्य’ या पातळीवर हवेतून पसरत आहे म्हणजे HPMV रुग्णाच्या संपर्कात जो येईल त्याला पण या विषाणूचा संसर्ग होण्याच्या घटना घडत आहेत, कोव्हीड-19 प्रमाणेच जेष्ठ वयोवृद्ध नागरिक, प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती व विशेषतः 14 वर्षाहून कमी वय असणाऱ्या लहान मुलांना याना हा विषाणू मोठ्या प्रमाणावर प्रभावित करत आहे, 2001 मध्ये शोध लागलेल्या HPMV विषाणू चा संसर्ग झालेल्या रुग्णांची नेमकी संख्या हि मागच्यावेळी प्रमाणेच चीन ने जाहीर केली नसली तरी त्याचा प्रादुर्भाव हा चिंताजनक आहे अश्या बातम्या चीन मधून येत आहेत.
‘आम्ही चीन मधील या HPMV विषाणू उद्रेक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि अजूनतरी भारतात HPMV संसर्गाच्या घटना उजेडात आल्या नाहीयेत त्यामुळे यामुळे भारतीय नागरिकांनी सध्यातरी घाबरून जाऊ नये’ असे आवाहन भारतीय आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) चे प्रमुख डॉक्टर अतुल गोयल यांनी केले आहे पण मागच्या कोव्हीड-19 प्रमाणेच जर भारतात पण या विषाणू चा प्रादुर्भाव झाला तर त्याचा प्रसार रोखण्यासाठी परत एकदा सरकारला कोव्हीड-19 प्रमाणेच उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली तर ‘इव्हेन्ट फोटोग्राफीक’ क्षेत्रासाठी अत्यंत मह्त्वाच्या असणाऱ्या मार्च ते जून या वेडिंग सिझन वर व साहजिकच त्यामुळे फोटोग्राफिक व्यवसायावर त्याचा नकारार्थी परिणाम होऊ शकतो त्यामुळे फोटोग्राफिक व्यावसायिकांनी एक ‘वाईटातील-वाईट शक्यता’ म्हणून याची मानसिक तयारी व आर्थिक नियोजन हे आधीच करून ठेवावे असे मला तरी वाटत आहे..
सोपान मोटे , छत्रपती संभाजीनगर
Discussion about this post