शिरूर अनंतपाळ/वाल्मीक सूर्यवंशी..
डॉ.जयद्रथ जाधव आजचे विद्यार्थी गुणवान, ज्ञानवान तर आहेतच ही गुणवत्ता अभ्यासातून त्यांनी सिध्द केली आहे. अशी गुणवत्ता शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असते पण व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करावे असे आवाहन शिवनेरी महाविद्यालय शिरूर अनंतपाळ येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील मराठी विभागप्रमुख डॉ.जयद्रथ जाधव यांनी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण धालगडे होते.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या
उपक्रमांतर्गत ‘वाचन व लेखन कौशल्ये’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. जयद्रथ जाधव यांनी वाचनाचे महत्त्व प्रतिपादित केले. वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो. पुस्तक वाचलेले मस्तक कुणापुढेही झुकत नाही.वाचन करून लेखन केल्याने त्या लेखनाला वैचारिकता प्राप्त होते,याकरिता विद्यार्थ्याने चौफेर वाचन केले पाहिजे. वाचन ही मानवाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची गुरुकिल्ली आहे.वाचन संस्कृतीची चळवळ घराघरात रुजली पाहिजे तरच संस्कारशील व प्रगतिशील भावी नागरिक निर्माण होतील.वाचनामुळे व्यक्ती विचारप्रवण बनतो व विचारप्रवण माणूस समाजशील बनतो.
असे विचार मांडताना त्यांनी अनेक संतांची व विचारवंतांची उदाहरणे देऊन आपले विचार स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम,संत तुकाराम अशा अनेक थोर व्यक्तींचे विचार वाचनातून आपण अंगीकृत केल्यास राष्ट्र उभारणीत मोलाची भूमिका पार पाडता येते. आजची तरुणाई फेसबुक, व्हाट्सअप आणि इंटरनेटच्या माध्यमातून वाचत आहे, परंतु हे वाचन बौद्धिक मानसिक भरण पोषण करू शकत नाही. आई-वडील जर पुस्तक वाचायला लागले तर त्या घरातील मुलं सुद्धा वाचन करतील म्हणून वाचनाचा संस्कार कुटुंबातूनच झाला पाहिजे. आई-वडील व गुरुजनानंतर पुस्तक वाचन हेच लहान मुलांवर संस्काराचे प्रभावी माध्यम आहे. वाचन संस्कारामध्ये शाळा महाविद्यालयाची जबाबदारी अधिक आहे. ग्रंथालयामध्ये उत्तम ग्रंथ संपदा असायला हवी.उत्तम ग्रंथ संग्रहाने समृद्धता येऊ शकते.
विद्यार्थ्यांच्या हाती जाणीवपूर्वक पुस्तके देण्याचे अनेक नवनवीन उपक्रम महाविद्यालयाने राबविले पाहिजेत. विद्यार्थ्यावर वाचनाचा संस्कार रुजवावा लागतो आणि हा संस्कार जेव्हा रुजतो तेव्हा समाजाचे समाज पण आणि माणसाचे माणूस पण घडते. आजच्या तरुणाईने आत्मज्ञानाकडे बौद्धिक विकासाकडे घेऊन जाणारे वाचन करावे. जग बदलण्याची ताकद पुस्तकात असते, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते पुस्तका इतकी शक्ती कोणत्याही शास्त्रात नाही पुस्तके वाचणारा समाज हा अत्यंत सुसंस्कृत उद्योगी संयमी आणि सामाजिक दृष्ट्या एकसंघ असतो. व्यक्ती आणि समाजाला वाचन हेच परिपूर्ण बनवत असते.आणि वाचनाच्या बळावरच माणूस सर्वश्रेष्ठ बनतो.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण धालगडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. गोरोबा रोडगे यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मारोती गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.किशोर कुरे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.कमलाकर सूर्यवंशी डॉ.ज्ञानेश्वर जाधव प्रा.गोरोबा रोडगे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post