
प्रतीनिधी प्रशांत माने नारायणगाव, ता. १५ : अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठीनारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांनी नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील दोन कॅफे चालक व धनगरवाडी येथील लॉज चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, शाळा परिसरात फिरणारे रोडरोमिओ, बेशिस्त वाहन चालक, सायलेन्सरचा कर्कश आवाज करणारे दुचाकीस्वार, अशा २२५ तरुणांवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करून ३ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. नारायणगाव पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकातील पोलिस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलिस उपनिरीक्षक जगदीश पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काळूराम साबळे, पोलिस हवालदार दत्ता तळपाडे, पोलिस हवालदार आदिनाथ लोखंडे, पोलिस अंमलदार दत्ता ढेंबरे, काळूराम मासाळकर, सत्यम केळकर, गोरक्ष हासे, आनंद चौगुले, टिल्लेश जाधव, महिला पोलिस अंमलदार सोनाली गडगे, शीतल गारगोटे. शुभांगी दरवडे, पूजा शहा यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.कॅफे व लॉज तपासणी मोहिमेत वारूळवाडी येथील म्युझिक कॅफे व नारायणगाव येथील कॅफे कॅपिटल या दोन अवैध कॅफेमध्ये शालेय अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी अश्लील चाळे करताना आढळून आल्याने कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, नियम व अटीचे उल्लंघन केल्यामुळे धनगरवाडी येथील नक्षत्र लॉजिंग चालकावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नारायणगाव परिसरातील कॅफे व लॉज चालकांची मीटिंग घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार यांनी संबंधित चालक व मालकांना अवैध व्यवसाय करणार नाही, अल्पवयीन मुलांना प्रवेश देणार नाही, प्रत्येक ग्राहकाचे रेकॉर्ड मेंटेन करावे, प्रत्येक हॉटेल, लॉजमध्ये सीसीटीव्ही बसवावेत आदी सूचना देण्यात आल्या. यावेळी संबंधित लॉज चालकांना नोटीसही बजावण्यात आली. नियम व अटींचे उल्लंघन करणाऱ्या कॅफे लॉज व रिसॉर्ट चालकांचे परवाने निलंबित करण्यात येतील, असा इशारा यावेळी शेलार यांनी दिला.
Discussion about this post