प्रतिनिधी असलम शेख रत्नागिरी *रत्नागिरी-* पत्रकार संघ, चिपळूण व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण येथे कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश व तालुका विधी सेवा समिती चिपळूणच्या अध्यक्ष डॉ. अनिता नेवसे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले, लोटीस्माचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, कार्यवाहक प्रकाश देशपांडे, अॕड. चिन्मय दीक्षित व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नागेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शिंदे तसेच बहुसंख्य पत्रकार व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
पत्रकार दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगताना डॉ. नेवसे यांनी १८३२ साली धडाडीचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रथमतः सुरू केलेल्या “दर्पण” या मराठी वृत्तपत्राचा उल्लेख करून आज १९३ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचे सांगितले. डाॕ नेवसे म्हणाल्या, भारतीय संविधानाच्या आर्टिकल १९ नुसार भारतीय नागरिकांना विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक मार्गदर्शक न्याय निर्णयांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार हा नागरिकांचा भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य केला आहे.
याबाबत सखोल मार्गदर्शन केले. आधुनिक काळात प्रसारमाध्यमांचा समाज जीवनावर अतिशय खोलवर प्रभाव पडत आहे. अशा या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात वृत्तपत्र तसेच इतर छापील माध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वृत्तपत्र स्वातंत्र्य ही जरी एक व्यापक संकल्पना असली तरी, या माध्यमातून काहीही छापण्याचा अधिकार या माध्यमांना नाही, म्हणून वृत्तपत्रांनादेखील कायद्याच्या चौकटीचे पालन करून माध्यमांची भूमिका काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे. याबाबत जाणीव करून दिली.
डॉ.नेवसे यांनी वृत्तपत्र व्यवसायासंबंधी असलेले विविध कायदे, वृत्तपत्र व पुस्तके नोंदणी कायदा १८६७ पासून ते महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७ च्या कायद्यापर्यंत पत्रकारांविषयी असलेल्या विविध कायदेविषयक तरतुदी समजावून सांगितल्या.
सर्वसाधारण वयोगटातील वाचकांवर दुष्परिणाम घडवू शकेल अशा साहित्याबाबत भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २९४ व २९५ प्रमाणे कारवाई होऊ शकते. शासनाकडून अधिकृतरित्या प्राप्त न झालेली व शोधपत्रकारितेचा उपयोग करून मिळवलेली गोपनीय माहिती वृत्तपत्रांनी प्रसिध्द केल्यास सदर वृत्तपत्रावर या कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे दंडनीय कारवाई होऊ शकते.
त्याचबरोबर फसवणूक करणा-या जाहिरातींविरूध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने कारवाई होऊ शकते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिर्णयातून प्रत्येक वृत्तपत्राला त्यांची पृष्ठ संख्या, विक्रीची ठिकाणे व आवृत्त्या ठरविण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले आहे व अशाप्रकारे भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ मधील भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य अंतर्भूत असल्याचे नमूद केले आहे. याबाबत माहिती दिली.
वृत्तपत्र स्वातंत्र्य हा लोकशाहीचा एक मोठा आधारस्तंभ असल्याचे” डाॕ नेवसे म्हणाल्या. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी निर्देशित केलेल्या ज्येष्ठ नागरिक, पीडीत महिला, अपंग व्यक्ति व बालके यासंबंधीच्या विविध योजना अंमलात आणण्याकरिता आज विविध स्तरांवर न्यायसंस्था, शासन संस्था, विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत व पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिक आणि या विविध यंत्रणा यामधील समन्वयक होवून सामाजिक बांधिलकी स्वीकारणे ही काळाची गरज आहे.
असे जिल्हा न्यायाधीश डॉ.नेवसे यांनी सांगून प्रत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजमाने यांनी सद्या नविन तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना व स्पर्धेच्या युगात पत्रकारिता वेगळ्या वळणावर जात असल्याची खंत व्यक्त करून पत्रकारांनी दोन्ही बाजूंची वस्तूस्थिती योग्य प्रकारे विचारात घेवून खरी बातमी देणे आवश्यक आहे.
सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळालेले पत्रकार राजेंद्र शिंदे व उपस्थित पत्रकारांचे पत्रकार दिनानिमित्त अभिनंदन केले. मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी पत्रकार हे लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक स्तंभ असून पत्रकारांनी त्यांचे कर्तव्य सचोटीने करणे आवश्यक आहे व त्यांनी समाजात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार धीरज वाटेकर यांनी केले. कायदेविषयक कार्यक्रमासाठी पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, लोटिस्माचे पदाधिकारी, कर्मचारी वृंद व पोलिस उपस्थित होते.
Discussion about this post