ता. प्रतिनिधि:- शेख मोईन,वनविभागाच्या गस्ती पथकाला मौजे मांडवा जंगलात शनिवारी (दि.११) सायंकाळी गस्त घालतांना तीन सागी तस्कर सागवान झाडे तोडतांना आढळले.
त्यांना रंगेहाथ पकडण्याच्या प्रयत्नात दोघे निसटून फरार झाले असून, एकाला मात्र ताब्यात घेण्यात यश मिळाले. झाडे कापण्याच्या अवजारासह सुमारे चार हजार १४४ रुपयांचा सागी माल जप्त करण्यात आला.
वनविभागाच्या गस्तीपथकाला मांडव्याच्या जंगलात शनिवारी गस्तीमध्ये लाकूड कापण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर कानोसा घेत तिथेपोहोचले. तेव्हा किनवट शहराच्या गंगानगर भागात राहणारा शेख अल्लाउद्दीन शेख उस्मान, शेख करीम शेख महेबूब (रा. हमाल कॉलनी) व शेख सोहेल शेख अख्तर (रा. सुभाषनगर) हे तिघे पूर्ण तयारझालेली सागी झाडे तोडून त्याचे कटसाईज मालात रुपांतर करीत होते.
वनकर्मचाऱ्यास पाहून दोन जण सागी माल तिथेच टाकून पळून गेलेत तर शेख अल्लाउद्दीन नामक तस्कर पकडल्या गेला. झाडे तोडण्याचीबारशी, करवत ही अवजारे व ०.२४९ घनमिटरचे तीन मोठे कटसाईज सागवानाचे लढे ताब्यात घेण्यात आले. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एम. एन. कत्तुलवार, वनरक्षक के. पी. मुळे, एम. के. केंद्रे, आर.बी. दांडेगावकर, बी.एस झंपलवाड, महेश भोरडे, ओम शिंदे, एस. एस. भूरके, वनसेवक नूरमामू तसेच वाहनचालक बाळकृष्ण आवले यांचा या कार्यवाहीत सहभाग होता.
Discussion about this post