आधुनिक युगात खेळाडूंनी खेळातील लवचिकता आणि त्यातील थरार आजही जपलाय.
पुणे, (13 जानेवारी) : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती निमित्त दिघी गावचे युवा नेतृत्व तथा ‘नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनचे’ अध्यक्ष श्री. उदय दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ‘भव्य उदय चषक-2025’ (जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा) दिघी येथे पार पडली. ‘नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन’ आणि ‘पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या’ संयुक्त विद्यमाने या भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या काळात नवीन पिढीला आपले पारंपरिक खेळ जपता आले पहिजेत या उद्देशाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील बारामती पासून ते आंबेगाव, जुन्नर येथील मल्लखांबपट्टूंनी उत्साहात सहभाग घेतला.
या स्पर्धेत मुले – मुली वयोगट (10 वर्षे / 12 वर्षे / 14वर्षे / 16 वर्षे ) अशा विविध गटांतील मल्लखांबपटूंनी आपले कौशल्य प्रदर्शित केले. मल्लखांबाच्या विविध प्रकारांमध्ये स्पर्धकांनी आपले दमदार खेळ दाखवत प्रेक्षकांचे मन जिंकले. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक श्री. दत्तात्रय (आबा) गायकवाड व युवा नेतृत्व तथा नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. उदय दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. दत्तात्रय (आबा) गायकवाड यांनी मल्लखांब हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा खेळ असून तो आजच्या पिढीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो, असे सांगितले. पुस्तक आणि मोबाईल पासून लांब राहून नव्या पिढीने कसरतीवर भर देणे गरजेचे आहे असे यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना कार्याध्यक्ष श्री. उत्तम लटपटे, वर्धा जिल्हा मल्लखांब संघटना सचिव श्री. संजय सुकळकर, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना सदस्य श्री. संजय केकाण, पुणे जिल्हा मल्लखांब संघटना सचिव श्री. सचिन परदेशी, छत्रपती मल्लखांब पुरस्कार विजेते श्री. रवींद्र पेठे, पुणे जिल्हा मलखांब संघटना कार्यकारणी सदस्य श्री. श्रीपाद जगताप, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व महाराष्ट्र मंडळ पंच श्री. अभिजीत भोसले , मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना सचिव श्री. आशिष देवल आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या स्पर्धेचे महत्त्व विशद केले. या स्पर्धेचे आयोजन करण्यामागे मल्लखांब खेळाचा प्रचार आणि प्रसार करणे, तरुण पिढीला या खेळाकडे आकर्षित करणे आणि मल्लखांबपटूंना एकत्र आणून त्यांच्यातील प्रतिभा निखारणे, हे उद्देश्य होते. अभ्यासू आणि निपक्षपातिपणे सर्व पंचांनी निकाल मार्गी काढत विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
“फक्त दप्तर, अभ्यास आणि मोबाईल यात नवीन पिढी न गुरफटून जाता आपल्या पारंपरिक खेळांवर देखील त्यांनी भर दिला पाहिजे. त्यांच्या शरीराची कसरत जपली पाहिजे. पारंपरिक मल्लखांब खेळाचा प्रसार व्हावा या उद्देशाने आम्ही समाजासमोर व नवीन युवा पिढीसमोर हा एक नवीन आदर्श ठेवण्याचा छोटासा संकल्प केला. असे शारीरिक कसरतीचे खेळ/ स्पर्धा आम्ही नेहमी राबवत असतो. भविष्यात देखील आम्ही यांना चालना देणार आहोत.”
- उदय दत्तात्रय गाईकवाड (अध्यक्ष : नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन, दिघी)
Discussion about this post