- अ. भा. म. नाट्य परिषद उदगीर शाखेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
उदगीर : (श्रीधर सावळे ) येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीरच्या वतीने ‘पारिवारिक स्नेह मिलन व गझल संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत गझलकरांनी हजेरी लावली होती. यामध्ये धाराशिव येथील स्नेहलता झरकर-अंदुरे, तुळजापूर येथील दास पाटील, कळंब येथील प्रा. शेखर गिरी व उदगीरचे सुपुत्र गझलकार शिव डोईजोडे यांच्या बहारदार गझल सादरीकरणामुळे उदगीरकर मंत्रमुग्ध झाले. उदगीर येथील श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय येथे उदगीर शाखेच्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या गझलसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्नेहलता झरकर-अंदुरे यांनी अनेक सामाजिक आशयाच्या गझलांचे सादरीकरण केले.
“कबरीतले उसासे जवळून ऐकल्यावर
यमुना अजून रडते, हा ताज हसल्यावर”
“गंधाळणार नाही चाफा कधीच आता,
तू कागदी फुलांना केसात माळल्यावर”
“कोटीत काल विकला असता रुमाल ओला,
डोळ्यातल्या सरींना रुपयात मोजल्यावर”
गझलकार दास पाटील यांनी
“कळ्या जाळून जाणाऱ्या उन्हाचे काय सांगू मी,
उन्हावर जीव जडलेल्या फुलांचे काय सांगू मी,
जणू फुलपाखरू हळवे कुण्या चिमटीत फडफडते,
तुझ्या वाचून नसलेल्या जीवाचे काय सांगू मी”
गझलकार प्रा. शेखर गिरी यांनी त्यांच्या खास शैलीत विविध आशयांच्या गझल सादर केल्या.
” प्रश्नाचेही उत्तर होते
सात वाजल्यानंतर
जग हे अजून सुंदर होते
सात वाजल्यानंतर
अंगाची या थरथर होते
सात वाजल्यानंतर
जखम आणखी कणखर होते
सात वाजल्यानंतर
असो कुठेही सुगंध येता मन आकर्षित होते
मदिरा सुद्धा अत्तर होते
सात वाजल्यानंतर”
उदगीरचे सुपुत्र गझलकार शिव डोईजोडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले व विविध गझल सादर केल्या.
“जीव इतका कुणालाच लावू नये
घाव इतका कधी खोल जाऊ नये
भेट झालीच जर का पुन्हा एकदा
कोण तू ? हे तिने विचारू नये”
“एक सीमा असावी नात्यांमध्ये
पत्र कोणी, कोणाचेच वाचू नये”
यासारख्या बहारदार गझल सादरीकरणातून सर्वच गझलकारांनी उदगीरकरांची मने जिंकली. कार्यक्रमाचा समारोप करताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, गझल ही समजायला अवघड असली तरी आशयगहन असते. श्रोत्यांना विविध कला प्रकारांची आवड लावणे, हेच नाट्य परिषदेचे प्रमुख दायित्व आहे. त्यामुळे पुढील काळात देखील विविध कार्यक्रम नाट्य परिषदेच्यावतीने घेतले जातील. त्यालाही रसिक श्रोत्यांनी साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव जेवळीकर यांनी तर आभार डॉ. किरण गुट्टे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उदगीर व परिसरातील अनेक गझलप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
Discussion about this post