निमित्त होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक स्व. बाबुरावजी घोलपसाहेब स्मृतिसप्ताहाचे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यमैफिल व काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी कवी दिलीप वाघमारे, हास्यकवी देवेंद्र गावंडे, प्रेमकवी आनंद गायकवाड तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संगीता जगताप, उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, मराठी विभागप्रमुख डॉ. सुवर्णा खोडदे,डॉ.विजय बालघरे,प्रा. शर्मिला देवकाते,ले.डॉ. विठ्ठल नाईकवडी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात सादर केलेल्या कवितांना विद्यार्थी व प्राध्यापक मंडळींनी शिट्ट्या,हशा टाळ्या त्याचबरोबर अश्रूंनी उत्स्फूर्त दाद दिली. कवी दिलीप वाघमारे यांनी सादर केलेल्या ‘देवा मी तुझी,की समद्यांची’या देवदासींच्या दुःखाचा वेध घेणाऱ्या कवितेने रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या.’चल लवकर गाडीवर बस,जाऊया पुण्यात’ या कवितेने प्रेक्षक भारावून गेले. कवी आनंद गायकवाड यांनी सादर केलेल्या प्रेमकवितांना विद्यार्थ्यांनी टाळ्या व शिट्ट्या यांचा गजर करीत दाद दिली. त्यांची गाण्याच्या चालीवरील प्रेमकविता “ज्या रस्त्यावर पाळत होती, तो रस्ता ती टाळत होती,येता जाता नजरेने,ती मन माझे जाळत होती.” ही कविता ऐकून विद्यार्थी अंतर्मुख झाले. तर हास्य कवी देवेंद्र गावंडे यांच्या चहा, ऍसिडिटी, चिकन-मटण, या कवितांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.त्यांची क्रांतीज्योती,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी ‘सावित्रीआई’ ही गेय कविता सर्वांच्या हृदयाला भिडली. “लढली जी वाघिणीवाणी, ऐका तिची कहाणी, ज्या मुलींसाठी ज्ञानज्योत जिने लाविली, अज्ञाना ज्ञानाने चिरुनी स्त्रियांना जिने लेखणी दिली” या कवितेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा ऐकून रसिक- प्रेक्षक स्तब्ध झाले. चित्रपटगीतांच्या चालीवरील त्यांच्या कवितांना विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ग्रंथपरीक्षण केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.(डॉ.) संगीता जगताप यांनी आपल्या मनोगतातअशा कार्यक्रमांची उपयुक्तता त्याचबरोबर युवाप्रतिभेला वाव देण्यासाठी कवीसंमेलनाचे महत्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.विजय बालघरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ.सुवर्णा खोडदे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन ले. डॉ.विठ्ठल नाईकवडी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शर्मिला देवकाते यांनी केले.
Discussion about this post