जिल्हाधिकारी कार्यालयात रंगला लाभार्थी मेळावा…‘संगणक शिकता शिकता कमवा’ योजनेच्या लाभार्थींकडून नातलगांना वस्त्ररूपी भेट
शिवजयंतीचे औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका शासकीय परंतु अनौपचारिक कार्यक्रमास उत्साह, अभिमान आणि आनंदाश्रू यांची अशा संमिश्र भावनांची झालर होती. निमित्त होतं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेच्या लाभार्थींच्या मेळाव्याचं.
सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेच्या लाभार्थींनी आपल्या पहिल्यावहिल्या कमाईतून आपल्या नातलग, जिवलगांना वस्त्ररूपी भेट दिली. मग ते कुणाचे आई वडील असोत, कुणाची सासूबाई असो कि कुणाचे सासरे, कुणाची जाऊबाई असो किंवा गुरू. या सर्वांनी आज आपल्या भावनांना वाट मोकळी करून देऊन सारथी संस्थेचे ऋणनिर्देश व्यक्त केले. सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नुकतेच रूजू झालेल्या अशोक काकडे यांनी तत्पूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यामुळे या कार्यक्रमात अनौपचारिकता व आत्मियता आली.
कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेताना कुणाच्या सासूबाईंनी प्रोत्साहन दिले. कुणाच्या सासऱ्यांनी रोज गाडीवरून प्रशिक्षण केंद्रात सोडले. कुणाला जाऊबाईंनी पाठिंबा दिला. एका रिक्षाचालकाने मुलगी माझा अभिमान, तिच्यासाठी काय पण, असे भावनाविवश उद्गार काढताच सभागृहात सर्वच उपस्थितांनी दाद दिली. यातील अनेक लाभार्थी प्रशिक्षण यशस्वी करून कुठे तरी नोकरी करत आहेत. त्यातून त्यांना स्वावलंबी होण्यास मदत झाली आहे. याचा अभिमान त्यांच्या पालकांच्या डोळ्यात दिसत होता. मुलांबद्दल भावना व्यक्त करताना पालकांचाही भावनिक ओलावा प्रदर्शित होत होता.
सारथी म्हणजेच छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण (CSMS-DEEP) कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील काही लाभार्थींनी स्वकमाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेच्या मिरज तालुक्यातील लाभार्थींचा मेळावा जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, समित कदम, विलास देसाई, संजय कदम, जिल्हा समन्वय अधिकारी परिमल पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आपल्या आयुष्यात सारथीच्या साथीने नवा किरण आल्याची भावना व्यक्त करत आपले अनुभव कथन करताना लाभार्थींना भावना अनावर झाल्या. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही प्रत्येक लाभार्थीची आपुलकीने विचारपूस केली. लाभार्थींच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदल ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याची भावना दिसत होती.
सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी आदि समाजातील विद्यार्थ्यांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास व्हावा, यासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते, असे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेतून राज्यातील 85 हजार तर सांगली जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना 9 महिने दररोज दोन तास संगणक प्रशिक्षण दिले जाते. त्यांची ऑनलाईन उपस्थिती पालकांनाही कळविली जाते. यावेळी सर्वांनी आपले आई वडील, सासू सासरे यांची काळजी घेण्याचा संस्कार जोपासावा, असा आपुलकीचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, प्रशासकीय अधिकारी म्हणून विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्याची परिमती आजच्या कार्यक्रमात पाहायला मिळाली. योजनेच्या लाभार्थींबरोबरच त्यांच्या कुटुंबांवरही सकारात्मक परिणाम होतो, हे आज अनुभवायला मिळाले. आजच्या कार्यक्रमात मुली-महिलांची संख्या अधिक असल्याने महिला सक्षमीकरण होत असल्याचे पाहून समाधान झाल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमातून सर्व प्रकारची नाती जपली गेल्याचे दिसून आले. स्वावलंबन, स्वयंरोजगाराचा संस्कार रूजत असल्याची जाणिव झाली, असे सांगून पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, सर्वांच्या सुरक्षिततेस पोलीस प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्यास नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत अनुचित घटना टाळण्यासाठी, जिल्हा नशामुक्त करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महापालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, लाभार्थी व कुटुंबिय यांच्या भावना पाहता हा उपक्रम निश्चितच लोकाभिमुख आहे. सन 2027 पर्यंत जवळपास 2 लाख मुलांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे नियोजन केल्याबद्दल सारथीचे तत्कालिन संचालक व सध्याचे सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे त्यांनी अभिनंदन केले.
सारथी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या चांगल्या कामाची फलनिष्पत्ती आजच्या कार्यक्रमातून आल्याचे सांगून समित कदम म्हणाले, अशा कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सारथी संस्थेच्या कारकिर्दीत केलेल्या पाठपुराव्यामुळे संस्थेसाठी चांगली इमारत उभी राहिल्याचे ते म्हणाले.
यावेळी विलास देसाई, ॲड. कैलास पाटील, अभिजीत शिंदे तसेच गीता पवार, अविनाश जाधव यांच्यासह योजनेच्या लाभार्थींनी मनोगत व्यक्त केले.
सारथी व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी राज्यगीत गायन करण्यात आले. तद्नंतर शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार करून वंदन केले. तालुका समन्वयक डॅनियल देवकुळे यांनी सारथी संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली. शिवजयंतीचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील दहाही तालुक्यात आज अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सारथीचे जिल्हा समन्वय अधिकारी परिमल पाटील यांनी स्वागत केले. शेवटी यशाची गुरूकिल्ली ही सारथी संस्थेची माहिती देणारी लघुचित्रफीत दाखवण्यात आली. डॅनियल देवकुळे यांनी आभार मानले.
Discussion about this post