







प्रा.दिलीप नाईकवाड : तालुका प्रतिनिधी..
भारत २०४७ मध्ये विकसित राष्ट्राची स्वप्न पाहत आहे व त्या दृष्टिकोनातून वर्तमानात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हा प्रवास भारताने केलेला आहे. विकसित राष्ट्रासाठी देशातील नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या किमान गरजा पूर्ण होऊन राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न वाढण्याची गरज आहे. त्यासाठी श्रीमंत श्रीमंत न होता देशातील गरिबांच्या गरजाही पूर्ण करून त्यांचे जीवनमान उंचवावे लागेल. त्यासाठी देशातील प्रत्येक गरिबाला निवारा मिळण्याची गरज आहे. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान आवास योजना आकाराला येत आहे व दिवसेंदिवस या कार्याची व्याप्ती वाढत आहे सिंदखेडराजा पंचायत समितीचे उद्दिष्ट ६ हजार १७४ घरांचे असून त्यातून ५१७१ घरकुलांचे प्रस्ताव पंचायत समिती सिदंखेडराजाला प्राप्त झाले असून त्या घरकुलांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात मेहकर आणि सिंदखेडराजा तालुका आघाडीवर असून जिल्ह्या त ५५ हजार गरिबांना हक्काचा निवारा मिळणार आहे. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न येत्या एक दोन महिन्यात पूर्ण होणार असल्याचे चित्र सिदंखेडराजाचा सह जिल्ह्यात दिसत आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील पंचायत समितीतील यंत्रणेने कात टाकून घरकुल योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनां मिळावा या दृष्टिकोनातून प्रक्रिया वेगाने करून अंमलबजावणीही केली आहे. पंचायत समिती स्तरावरून घरकुल योजना कुठल्याही प्रकारे लालफितीत अडकणार नाही याबाबत नुकतेच नव्याने रुजू झालेले बीडीओ .अंकुश मस्के यांनी आश्वासन दिले नाही तर कृतीयुक्त कार्यक्रम राबवला.
बुलढाणा जिल्ह्याचे ६३ हजार ६८२ घरकुलाचे उद्दिष्ट असून वरिष्ठ स्तरावरून सूचना वजा दबाव जिल्हास्तर ते ग्रामपंचायत व्यवस्थेवर होता व त्यामुळे सर्व स्तरातून सकारात्मक पावलेही उचलण्यात आली.
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागात मिळणारे अनुदान १ लाख २० हजार आहे. त्यासाठी लाभार्थ्याकडे २७० स्क्वेअर फुट जागा असण्याची अटही आहे. पंचायत समिती कडून ग्रामपंचायतला सूचना करून प्रस्ताव मागवण्यात आले होते. जिल्ह्यात ५४ हजार ५३५ प्रस्ताव आले होते त्यांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थ्यांना येत्या पंधरा ते वीस दिवसात अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त होण्यास काही हरकत नाही. पंतप्रधान आवास योजनेतून मिळणारे अनुदानाचे चार टप्पे करण्यात आले असून एक लाख वीस हजारा पैकी अनुदानातून पहिला हप्ता काम सुरू केल्यावर १५ हजाराचा. दुसरा हप्ता बांधकाम प्लिंथ लेव्हल आल्यावर 70 हजाराचा तिसरा हप्ता लेंटल लेवलला ३० हजाराचा असणार आहे. अनुदानाचा लाभ सरळ लाभार्थ्याला व्हावा त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने त्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. शिवाय रोजगार हमी मजुरी ३७ हजार व स्वच्छतागृहासाठी १२ हजार असे ३६ हजार मिळून एकूण रक्कम १ लाख ५३ हजार लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे .
याबाबत प्रत्यक्ष प्रतिनिधींनी लाभार्थ्यांची भेट घेतली असता लाभार्थ्यांनीं हे अनुदान अपुरे असून ग्रामीण भागासाठी बांधकाम साहित्याचा खर्चाचा विचार करता अडीच ते तीन लाख तरी अनुदान मिळायला पाहिजे अशी अपेक्षा केलेली आहे कर्ज काढणे, व्याजाने पैसे घेणे, काहींनी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडूनही उसनवारी करून आपल्याला घराचे काम करावे लागले अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहे.
सिदंखेडराजा तालुक्यासह जिल्ह्यात एका बाजूला रेती माफीयानीं राजरोसपणे रेती तस्करी अधिकारी व राजकारणी यांच्याशी मधुर संबंध निर्माण करून सुरू ठेवलेली आहे. जिल्हाधिकारी ते तहसीलदार पटवारी या शासकीय यंत्रणेचा अंकुश या व्यवस्थेवर नाही. कधीतरी दाखवण्यासाठी थातुर मातूर कारवाया शासकीय यंत्रणा करत असल्याचे देखावे निर्माण करतात .दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात व तालुक्यात अनेक घरकुलांना रेती उपलब्ध नसल्यामुळे काही कामे अर्धवट तर काही घरकुलांची कामे सुरूही झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी रेतीघाट लिलाव केल्यास शासनाचा महसूलही वाढेल व स्वस्त दरात गरीब लाभार्थी यांना घरकुलासाठी रेती उपलब्ध होईल परंतु यासाठी प्रामाणिक अधिकारी व इच्छाशक्ती असणारे लोकप्रतिनिधी असायला हवे.
सिंदखेडराजा पंचायत समितीचे ६ हजार १७४ घरकुलाचे उद्दिष्ट असून त्यापैकी ५ हजार १७९ प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावरून सिदंखेडराजा पंचायत समितीला प्राप्त झाले असून त्या प्रस्तावांना मान्यताही देण्यात आल्याची माहिती असून विना विलंब प्रक्रिया पूर्ण झालेली आहे .आजही अनेक ग्रामपंचायत अंतर्गत लाभार्थ्यांनां घरकुल बांधण्यासाठी हक्काची व मालकीची जागा नावावर नसल्यामुळे ९९५ घरकुलांचे लाभार्थ्यांच्यां घरकुलाच्या स्वप्नांवर तूर्त तरी विरजण पडलेले आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्नपूर्वक मार्ग काढण्याची गरज आहे सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत या घरकुल निवास योजनेला गती देण्याचे काम बीडीओसह त्यांचे सहकारी गृहनिर्माण अभियंता संतोष सरोदे, अरुण मोरे, सचिन मदनकर, संगणक तज्ञ विशाल लिहिणार, अमित पवार या सर्वांचां सकारात्मक दृष्टिकोन लाभार्थ्यांच्या निवारांचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण ठरत आहे..
Discussion about this post