
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
गोंडऊमरी परिसरातील अनेक गावांतील शेतीत मका,तूर, हरभरा, मूग, तसेच काकडी, भेंडी, गवार, वांगी, चवळी, कारली भाजीपाला आदी पिके आहेत. या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण करणे अनेकांना शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी साड्यांचा पर्याय निवडला आहे. घरातील जुन्या साड्या किंवा बाजारातील जुनी साडी कमी किमतीमध्ये खरेदी करून त्यांचे कुंपण केले जात आहे. वाऱ्यामुळे साड्यांचा आवाज होत असल्याने काही पशू शेतात व परसबागेत प्रवेश करत नसल्याचे चित्र आहे. त्यातून शेती पिकांचे संरक्षण होऊ लागले आहे.
परिसरात यावर्षी रब्बीतील पिके जोमात आली आहेत.मका, हरभरा,मुग, तसेच काकडी, भेंडी,गवार, वांगी, चवळी, कारली ही पिके बहरली आहेत. मात्र, काही पशु-पक्षी ती खात असून नासधूस करत आहेत. परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्यानंतर रब्बी पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे. त्यामुळे पीक वाचवण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करत आहेत. अनेक गावांतील शेतकऱ्यांनी शेती तसेच परसबागेतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी चक्क साड्यांचे कुंपण करण्याची शक्कल लढवली आहे. सद्यस्थितीत तारेचे कुंपण अनेकांना शक्य नसल्याने साड्यांचा पर्याय निवडला जात आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश परसबागेला साड्यांचे कुंपण दिसत आहे. शेतकऱ्यांनी लढवलेली ही शक्कल चर्चेचा विषय बनली आहे.
साडीचे कुंपण स्वस्त होत असल्याने शेतीला साडीचे कुंपण करण्यासाठी शेतकरी घरातील जुन्या साड्या वापरतात. मात्र, ते कमी पडत असल्याने कमी किमतीत मिळणाऱ्या साड्या शहरातून विकत आणून त्यांचे कुंपण घातले जाते. त्याचाही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर बसतो. मात्र, घरातील वापरात नसलेल्या साड्यांचा उपयोग पीक संरक्षणासाठी होत असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ लागला आहे. रब्बी हंगामात लागवड केलेल्या मका,हरभरा, वाल, मूग, तूर पीक तसेच काकडी, भेंडी, गवार, वांगी, चवळी, कारली या भाजीपाला पिकांचे संरक्षण होत आहे.
विनावापरातील साड्यांचा उपयोग शेती आणि परसबागेतील रब्बी हंगामातील पिके तसेच भाजीपाल्यांच्या संरक्षणासाठी शेतकरी करत आहेत. पिकाचे नासधूस करणाऱ्या पशु-पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण साड्यांच्या कुपणामुळे होत आहे.
— प्रमोद पंढरी ऊके, शेतकरी, गोंडऊमरी..
Discussion about this post