
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
यंदा जानेवारीच्या शेवटच्या आटवड्यापासून रात्री थंडी तर दिवसभर कडक उन्ह पडत होते. फेब्रुवारी सुरू होताच उन्हाची तीव्रता वाढली आहे. मार्च, एप्रिल, मे महिण्याचा विचार नं केलेला बरा, अशी स्थिती आत्ताच पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यातच उन्हाची धग सुरू झाली आहे. थंड पाण्यासाठी मात्र गरिबांचे फ्रीज म्हणून संबोधले जाणाऱ्या मातीच्या माठाला सर्वाधिक मागणी असल्याने गोंडऊमरी आठवडी बाजारात व शहरात ठिकठिकाणी माठ नव्या आकारात विविध रंगाढंगात बाजारात उपलब्ध झाले आहेत.
परिसरासह साकोली तालुक्यात गेल्या आठ दिवसापासुन कडक उन्हाळा सुरु झाला आहे. उकाडा वाढताच प्रत्येकाला उकाड्यापासून सुटका पाहिजे असते. शितपेयाबरोबरच थंड पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात तहाण भागवण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील काही कुटूंब फ्रीज जारच्या पाण्याचा वापर करतात. तर शहरातील गोरगरीब व ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंब, सर्वसामान्य नागरिकांचा कल हा माठाच्या पाण्याकडे असतो. शहरातील विविध भागात आणि ग्रामीण भागातील आठवडी बाजारात आकर्षक असे मातीचे माठ विविध रंगात विक्रीस दाखल झाले आहेत.ग्रामीण भागातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसात घरी, शेतात थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी बहुतेक शेतकरी, मजुर हे मातीच्या माठाचा वापर आज ही करताना दिसत आहेत. कुंभार बांधव हे मातीपासून बनवलेले छोटे-मोठे माठ हे शंभर
रुपयांच्या आसपास विक्री करत असायच्या पण कालांतराने यात अमुलाग्र बदल होउन नळाची तोटी असलेल्या माठाची मागणी वाढली. उन्हाळा सुरू होत असल्याने शहरातील विविध ठिकाणी आकर्षक असलेल्या माठांचे स्टॉल बाजारात लागले आहेत.
माठाच्या पाण्याला पसंती
शेतकरी कुटूंबात भाजीपाल्यासाठी फ्रीजचा तर थंड पाण्यासाठी माठाचा वापर करतात. ग्रामीण भागात पूर्वी फ्रीज किंवा विद्युत उपकरणे नव्हती. कालांतराने ती उपकरणे शेतकरी कुटूंबात आली.शेतकऱ्याची घरी भाजीपाल्यासाठी फ्रीजचा वापर तर थंड पाण्यासाठी मात्र आजही माठाचा वापर केला जात आहे. केवळ उन्हाळ्यापुरतेच नाही तर तिन्ही ऋतूत थंड पाण्यासाठी घरी, शेतात माठाचा वापर सर्रास वापर केला जात आहे.
मातीच्या घागरीचा ओढा कायम
पिण्याच्या पाण्यासाठी मात्र आजही फार्म हाऊसवर मातीच्या घागरीचा वापर केला जात आहे. फ्रिजच्या पाण्यापेक्षा मातीच्या घागरीतील पाणी आरोग्यदायी असते. शेती व शेतकरी हे आधुनिक असले तरी शेतात पिण्याच्या पाण्यासाठी मात्र मातीच्या घागरीचा आजही वापर सुरु आहे.
— मनोहर लोथे शेतकरी, गोंडऊमरी ..
Discussion about this post