शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: बघता-बघता हिवाळ्यातील गुलाबी थंडीचे दिवस संपून गेले आणि उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, उष्प्यात प्रचंड वाढ झाली आहे. अंगाची काहिली होत असून, तापमानवाढीने नागरिक हैराण झाले आहेत.
या वर्षी सर्वत्रच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसाळा ऋतू संपला तरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस सुरूच होता. त्यामुळे हिवाळ्यात थंडीचे प्रमाण अधिक राहील, असे जाणकारांचे मत होते; मात्र काही काळ वगळता थंडीचे प्रमाण कमीच राहिले. सध्या दिवसा उष्म्यात प्रचंड वाढ झाली आहे. पहाटेच्या वेळी मात्र हवेत काही प्रमाणात गारवा जाणवत आहे.एकंदरीतच उन्हाळ्याची चाहुल लागल्याने गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या मातीचे मडके, शीतपेये, सुती कपड्यांना मागणी वाढली आहे.तसेच घरोघरी पंखा, कूलरची घरघर वाढली आहे. नागरिक दुपारच्या वेळी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळताना दिसत आहेत.
उन्हाळ्याच्या काळात नागरिकांनी उष्माघाताचे प्रकार घडू नयेत यासाठी आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. या काळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज असेल तर दुपारी बारा ते तीन दरम्यान घराबाहेर पडावे. तहान नसेल तरी भरपूर पाणी प्यावे. अंगावर पांढरे सुती कपडे व डोक्यावर टोपी वापरावी. हलका आहार घ्यावा, शिळे अन्न खाऊ नये, उष्माघाताचे प्रकार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
डॉ. चंदन राठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोंडऊमरी.
Discussion about this post