पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मुक्या जीवांवर प्रेम करावे ही संतांची शिकवण. संत गाडगेबाबा सांगून गेले; ‘देव दगडात नसून माणसात आहे’. परंतु हल्लीच्या काळात माणसांना माणसांत ‘माणूस’ शोधायला वेळ नाही; तर मुक्या जीवांवर प्रेम करणे तर दूरच…
म्हणतात ना, “आगीशिवाय कढ नाही, अन माये शिवाय रड नाही”. संवेदनशीलता ही काही प्रमाणात अंगी असावीच कारण त्याशिवाय आपल्या माणूस होण्याला काही अर्थ नसतो. परमेश्वर सर्व प्राण्यांमध्ये आहे असे आपण म्हणतो, बोलतो, सांगतो पण आचरणात आणत नाही, पण काही माणसं आपल्या कृतीतून दाखवून देत असतात अशीच एक व्यक्ती….
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका कडा येथील प्राणीमित्र- हा गेल्या बारा वर्षापासून निरंतर नि:स्वार्थ भावनेने मुक्या जीवांसाठी काम करत आहे. आजपर्यंत त्याने हजारोंच्या संख्येत छोट-मोठे पशु-पक्षी वाचविले आहेत, प्राणीमित्र नितीन आळकुटे हा एक उच्च शिक्षित आहे त्याच्याकडे आहारशास्त्र, संगणकशास्त्र, योगशास्त्र,फिजिकल एज्यूकेशन या पदव्या त्याने मिळविल्या आहेत.त्याने नोकरीच्या अनेक संधी सोडत मुक्या प्राण्यांना वाचवण्याचे व्रत हाती घेतले आहे. जेवढं मिळते, त्यातच तो समाधानी राहून हे परोपकारी काम करत आहे.
स्व:ताचा जीव धोक्यात घालून निसर्गातील जीवांचे रक्षण.
विहिरीत पडलेले प्राणी त्याने जीवाची पर्वा न करता भरपूर मुक्या जनावरांना जीव धोक्यात घालून वाचवले आहे. बिबट्या,लांडगे,कोल्हे, काळवीट,हरिण, उदरमांजर,श्वानमांजर असे अनेक प्राण्यांचे जीव रक्षिले आहेत.तसेच विविध पक्षी, दोरीत अडकलेले, जखमी झालेले पक्षी, वन्यजीव यांना प्रथम उपचार करुन पुन्हा निसर्गात सोडले आहेत. तर अनेक भटके प्राणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्याना उपचारासाठी आपल्या कडे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पुणे, नगर अशा विविध शहरात उपचारासाठी दाखल केले आहेत. त्याने या कार्यासाठी स्व:ताला झोकून दिले आहे. साधू संतांनी दिलेला ‘भुतदये’चा संदेश त्याच्या प्रत्यक्ष कृतीत दिसून येतो.
सन २०१२ साली पडलेल्या दुष्काळात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी चारा पाण्याची सोय केली होती तेव्हा पासून हे काम अविरतपणे सुरू आहे. त्याने तालुक्यात विविध ठिकाणी माळरानावर डोंगरात पानवठे निर्माण केले आहेत त्यासाठी लोकांना जागृत करून लोकसहभाग घेऊन हे कार्य चालू असते.त्यांना पुढे जावून पण हेच काम करायचं आहे. त्या कार्याला मोठं स्वरूप देण्यासाठी सहकारी मित्रांना सोबत घेऊन ‘जीवदया फाउंडेशन’ या नावाने संस्था सुरू केली आहे, जखमी व आजारी झालेल्या पशू पक्ष्यांना ठेवण्यासाठी निवारा केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
‘सारथी महाराष्ट्राचा’ च्या असंख्य वाचकांना आपला सार्थ अभिमान आहे.
Discussion about this post