सोने-चांदीचे दर गगनाला, सोशल मीडियावर निमंत्रणाचा ट्रेंड वाढला
निमंत्रितांकरीताच होतेय पत्रिकांची छपाई
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: दिवसेंदिवस ऋतुचक्रात बदल होत असल्यामुळे फेब्रुवारीपासून उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. मार्च ते जून या चार महिन्यात 34 लग्न मुहूर्त आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधलेले अनेकजण त्या कालावधीतच लग्नाचा बार उडवून देण्यासाठी इच्छुक आहेत. सोने चांदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता नसल्यामुळे संभाव्य भाववाढ लक्षात घेवून वर आणि वधू पक्षाकडील मंडळी खरेदीसाठी सराफी दुकानाच्या पायऱ्या चढत आहेत. दुसरीकडे छपाई दरात
देखील सरासरी 15 ते 20 टक्के वाढ झाल्याने आवश्यक तेवढ्याच लग्न निमंत्रण पत्रिका छापून इतरांना सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण देण्याकडील कल वाढत चालला आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातच 24 लग्नाचे मुहूर्त होते. त्यामुळे बहुतांशी शहरी भागातील मंगल कार्यालयांमध्ये गर्दी होती. सोने चांदी दराने मध्यंतरी उच्चांक गाठला होता. तो अद्यापही कायम आहे. सोने चांदी दरात कितीही चढ उतार झाला तरी लग्न आणि दागिने हे समीकरण असल्यामुळे सोने चांदी खरेदीसाठी असलेली गर्दी काही कमी होत नाही. मागील काही महिन्यांपासून सोने 80 हजारच्या खाली उतरण्यात तयार नाही. सध्या सोने 85 हजार 900 तर चांदी 95 हजार 800 रुपयांवर गेली आहे. मार्च महिन्यात 5, एप्रिलमध्ये 9, मे महिन्यात 15 आणि जूनमध्ये 5 लग्न मुहूर्त आहेत. ज्यांच्या घरात लग्नसराई सुरु होणार आहे त्यांनी संभाव्य भाववाढ लक्षात घेवून दागिने खरेदी करण्यास प्राथमिकता दिली आहे. सोने-चांदी विक्रेत्यांनी आपल्याकडे ग्राहक खेचण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. तसेच नववर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण दागिन्यांचे प्रकार बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मागील काही महिन्यांची सोने चांदीचे भाव पाहता यामध्ये फारशी घट होईल असे चित्र नाही. परिणामी लग्नापूर्वी काही दिवस दागिने घेण्यापेक्षा तत्पूर्वी किमान दोन ते तीन महिने सोने खरेदीस वऱ्हाडी प्राधान्य देत असल्याचे पहावयास मिळत आहे.
अनावश्यक खर्चाला फाटा
दिवसेंदिवस महागाईचा रेषो वाढतच चालला आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत परगावी लग्न झाले की हमखास एक किंवा दोन दिवसानंतर सायंकाळच्या सुमारास रिसेप्शन असायचे. मात्र हा ट्रेंड सध्या ओसरला असल्याचे पहावयास मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे अनेकांनी केवळ लग्न समारंभालाच महत्व दिले असल्याचे चित्र आहे.
Discussion about this post