
शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर सावनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय शिवाजी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिनेश इंगोले यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याविषयी अपशब्द वापरले. तसेच, जेम्स लेन या लेखकाने लिहिलेल्या वादग्रस्त पुस्तकाचे समर्थन करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, असा आरोप इंगोले यांनी केला आहे. कोरटकर यांनी मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसेच इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे.
कोरटकर यांनी फोनवरील संभाषणात ‘ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही काम करत आहात हे लक्षात ठेवा’, ‘बाजीप्रभू बसले असते तर तुमचा महाराज जिवंत नसता’, ‘तुमचे महाराज पळून गेले’, ‘जेम्स लेनचे पुस्तक वाचा, लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे, तू इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी’ असे आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कोरटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post