
गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवांचे अनेक मेसेज पहावयास मिळत आहेत. हे वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे सध्या आपल्या समाजातील विविध संघटनांच्या बैठका. आणि त्या बैठकांमधून आमच्या संघटनेने समाजाच्या विकासासाठी आतापर्यंत किती प्रचंड काम केले आहे, ही सांगण्याची फुकटची व्यर्थ धडपड. आणि त्यामुळेच हे सर्व चालू असताना एक सुज्ञ समाज बांधव म्हणून मला कांही गोष्टी ठळकपणे आपल्यासमोर मांडाव्यात असे वाटले म्हणून हा सर्व उपद्व्याप.
मा. आण्णा हजारे यांच्या चळवळीत काम करणारा तळागाळातला, एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आज स्व कर्तुत्वाने महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्रीपदाच्या दर्जा असणाऱ्या, राज्य अन्न आयोगाचा अध्यक्ष बनला. ती व्यक्ती म्हणजे श्री महेशजी ढवळे.
मात्र या पदाचा वापर स्वतःची प्रतिष्ठा वाढावी यासाठी न करता,आपल्या या पदाचा फायदा, आपल्या समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. या भावनेने ही व्यक्ती संपूर्ण समाजामध्ये काम करु लागली. परंतु हे काम करत असताना सर्वार्थाने, सर्वांचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर सर्वांनी संघटित झाले पाहिजे, एका छताखाली एकत्र आले पाहिजे याची जाणीव त्यांना झाली. म्हणूनच शिंपी समाजातील सर्व पोट जातींना एकत्र आणण्याबरोबरच , संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांना दैवत मानणाऱ्या हिंदू धर्मातील सर्वांना एकाच छताखाली एकत्र आणावे या उद्देशाने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ या संघटनेची स्थापना केली. या एकसंघाच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांना शासन स्तरावर वाचा फोडण्यास त्यांनी सुरुवात केली.
शासन स्तरावरील आपल्या पदाच्या वापर करून त्यांनी अनेक वर्षापासून, समाजातून मागणी होत असलेल्या, आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी प्रयत्न केला. आणि त्यातूनच संत नामदेव आर्थिक विकास महामंडळ याची शासनाकडून घोषणा करण्यात आली. या महामंडळाच्या स्थापनेसाठी अनेक वर्षापासून अनेक लोकांनी प्रयत्न केले होते हे सत्यच आहे. परंतु ज्यांच्यामुळे हे घडून आले ते म्हणजे माननीय श्री महेशजी ढवळे, हेही तितकेच निर्विवाद सत्य, आपणा सर्वांना मान्य करायला हवे. कारण हे सर्व सांगत असताना मला प्रकर्षांने एक गोष्ट मांडावीशी वाटते. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला आपण एक वाक्य ऐकतो, ते म्हणजे, लग्नाच्या जेवणावळीमध्ये वाढपी हा आपला असला पाहिजे. कारण तो जर आपला असेल तरच मोठ्या प्रमाणात मिष्टान्न हे आपल्या ताटात पडत असतात. म्हणूनच संत नामदेव आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेत माननीय महेशजींचा वाटा हा सिंहाचा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
या ठिकाणी मला आणखी एक मत प्रांजलपणे मांडावेसे वाटते ते म्हणजे पंढरपूर येथील संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे स्मारक. हा विषय अनेक वर्षांपासून अनेक कारणाने रेंगाळत पडलेला होता. परंतु माननीय महेशजींच्या प्रयत्नामुळेच लवकरच पंढरपूर येथे जागतिक दर्जाचे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे.
याबरोबरच आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामुख्याने रोजगार निर्मितीसाठी अनेक नवनवीन योजना माननीय महेशजींच्या नेतृत्वाखालील एकसंघ तयार करीत आहे. आणि या सर्वांमुळेच माननीय महेशजींच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाला समाजातील सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, ही गोष्ट इतर काही संघटनांना रुचताना दिसत नाही आहे. म्हणूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ही नुसती उठाठेव चालू आहे असे मला वाटते. आतापर्यंतच्या या सर्व घटनांचा आपण विचार केला तर माझ्या या मताशी आपण ही सहमत असाल याची मला खात्री आहे.
सुज्ञास अति सांगणे न लगे…
श्री. धनंजय शकुंतला बाळकृष्ण गोंदकर, सांगली.
श्री प्रभु पुनम राजेंद्र सोनवणे
श्री मनोज रमेश भांडारकर..
Discussion about this post