शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती येणार आहे. सोमवारी महापालिका नगररचना विभागाने या रस्त्याचे नव्याने मापे घेण्याचे काम सुरू केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज अंदाजपत्रकाप्रमाणे २२ मीटर रस्ता रूदीकरण होण्यासाठी रस्ताशेजारील काही खासगी मिळकत बाधित होत आहे.
काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागणार आहेत.
अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा दिड मीटर रुंदीच्या गटारी आणि त्यावर पादचारी (फुटपाथ) चे काम होणे आहे. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची पूर्वेची भिंत, शहरी बस स्थानक भिंत, मुख्य बस स्थानक भिंत हटविण्याचा निर्णय झाला आहे. भिंती हटविल्यानंतर हा रस्ता २२ मीटर उपलब्ध होणार आहे. याबाबत मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार 6 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक झाली. बैठकीत 22 मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार पुन्हा मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. शुक्रवारी आयुक्त शुभम गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पाहणी करून पुन्हा नव्याने मोजमाप आणि मार्किंग करण्याची सूचना केली. त्यानुसार सोमवारी नगररचनाकार वैभव वाघमारे, शाखा अभियंता पंकजा रुईकर, रवींद्र भिंगारदेव, आलम अत्तार, संजय कांबळे, आदी अधिकाऱ्यांच्या पथकाकडून रस्त्याची मापे घेऊन मार्किंग करण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, यापूर्वीच चार-चार वेळा मापे घेऊन मार्किंग निश्चित केले असताना पुन्हा मापे घेऊन प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? असा सवाल मिरज सुधार समितीने उपस्थित केला आहे.
Discussion about this post