निवडणूक होताच योजना बंद करण्याचा निर्णय : गोरगरीब राहणार वंचित
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: राज्य शासनाने गरिबांचा कैवारी ही प्रतिमा जपण्यासाठी 4 ऑक्टोबर 2022 रोजी अध्यादेश काढून दिवाळीसह प्रमुख सणांना गोरगरिबांना आनंदाचा शिधा सुरू केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही ही योजना कॅश करताना गोरगरिबांची मते पदरात पाडून घेतली, मात्र आता निवडणुका संपल्याने हा शिधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही योजना म्हणजे निवडणूक जुमला ठरली आहे.जिल्ह्यातील 2,76,113 पात्र लाभार्थी आनंदाच्या शिधाला मुकणार आहेत.
अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 मध्ये परिभाषित केल्यानुसार प्राधान्य कुटुंबांचा समावेश आहे. हे किट आत्महत्या प्रवण जिल्हे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौदा जिल्ह्यांतील एपीएल शेतकरी (केशरी) कार्डधारकांनाही वितरित केले जात होते. खरे तर गरीब आणि गरजू नागरिकांना सणासुदीचा काळ आनंदात जावा, यासाठी सरकारने ‘आनंदाचा शिधा’ ही योजना सुरू केली होती; मात्र ही योजना बंद करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी गरीब नागरिकांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाही.
निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देणाऱ्या योजना सरकारने आणल्या; मात्र निवडणूक झाल्यानंतर पहिल्या अर्थसंकल्पापूर्वीच तिजोरीत खडखडाट जाणवू लागल्याने जाहीर केलेल्या योजनांना शासन
कात्री लावत आहे. काही योजनांचे निकष कडक करताना लाभार्थ्यांना लाभच मिळू नये, याची दक्षता घेतली जात आहे. आनंदाचा शिधा योजना बंद केल्याने यंदाचा गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी यासारख्या सणांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत. त्यामुळे पात्र नागरिकांना या वस्तू बाजारभावा प्रमाणेच खरेदी कराव्या लागणार आहेत. लाडक्या बहीण योजनेमुळे तिजोरीमध्ये खडखडात आहे, असे सांगितले जात असले
तरी ही योजना निवडणुकीपूर्वीच जाहीर केली होती. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने ही योजना बंद झाल्यास त्याचा परिणाम लाखो लाभाथ्यर्थ्यांवर थेट होणार आहे. त्यामुळे सणासुदीला का असेना सुरू केलेला आनंदाचा शिधा शासनाने बंद करू नये, अशा प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहेत.
अशी आहे योजना
सुरुवातीला ‘आनंदाचा शिधा’ किटमध्ये प्रत्येकी 500 ग्रॅमचे पोहे आणि मैदा या दोन वस्तूंचा समावेश केला आहे. त्यानंतर दिवाळी 2023 च्या निमित्ताने किटमध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल आणि रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे अशा 6 वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, किटच्या लाभार्थ्यांमध्ये अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 मध्ये परिभाषित केल्यानुसार प्राधान्य कुटुंबांचा समावेश असणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी संख्या
भंडारा जिल्ह्यातील 2 लाख 76 हजार 113 लाभार्थी आनंदाचा शिधासाठी पात्र आहेत. अंत्योदय गटात 66 हजार 571, प्राधान्य गटात 1 लाख 85 हजार 550. (एपीएल) गट 23 हजार 992 लाभार्थी आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रखा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल आदी शिधा जिन्नस देण्यात आले होते. सणासुदीत या शिघाचा मोठा आधार होता. मात्र, रेशनमध्ये शिधा येणे बंद झाले आहे.
Discussion about this post