लोहा कंधार, प्रतिनिधी
लोहा कंधार मतदारसंघातील मानार प्रकल्प बारूळ धरणाचे पाणी लातूर जिल्ह्यातील १२९ गावांना पुरवठा करण्याच्या निर्णयाविरोधात माजी आमदार रोहिदास चव्हाण आणि शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.
शेतकऱ्यांचा आक्रोश – हक्काचे पाणी बाहेर का?
शिवसेना नेते आणि लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी ५ मार्च २०२५ रोजी मानार प्रकल्प क्षेत्रात जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात कंधार पंचायत समितीचे माजी सभापती माणिकराव चोपवाड, हळदवचे माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर, गणपतराव गायकवाड, प्रा. प्रभाकर व्यवहारे, व्यंकटराव घोरपडे, विठ्ठल गवळी, पांडुरंग गायकवाड, नामदेव कांबळे आणि अनेक लाभधारक शेतकरी सहभागी झाले होते.
पाणी बाहेर नेण्याचा विरोध – शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा
माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी सांगितले की, १९६४ मध्ये बारूळ परिसरात मानार प्रकल्पाची निर्मिती झाली. या भागातील शेतकरी शेतीच्या भरोशावर जगतो. मात्र, आता सरकारने ६०० कोटी रुपयांच्या योजनेतून हे पाणी लातूर जिल्ह्यात वळवण्याचा निर्णय घेतला आहे, जो अत्यंत अन्यायकारक आहे.
“जेव्हा मी आमदार होतो, तेव्हा एकाही धरणाचे पाणी बाहेर जाऊ दिले नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून ३९३ कोटी रुपये मंजूर करून अनेक तलाव आणि धरणांचे गाळ काढून पाणीसाठा वाढवला. मात्र, आजचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत दिसत आहे, त्याचा हा विरोध आहे.” – माजी आमदार रोहिदास चव्हाण.
शेतकऱ्यांच्या मागण्या आणि इशारा
- लोहा-कंधार तालुक्यातील पाणी बाहेर जिल्ह्यात वळवू नये.
- धरणातील संपूर्ण गाळ काढून पाणीसाठा वाढवावा.
- ग्रामपंचायत ठराव घेतला का? याची चौकशी व्हावी.
- पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कोणतीही योजना लागू करू नये.
- पाणी बाहेर वळवण्याचे काम तात्काळ बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
सरकारला थेट इशारा
माजी आमदार चव्हाण यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तरीही लोहा-कंधारच्या पाण्यावर अट्टाहास का? या निर्णयाविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी इशारा देण्यात आला आहे.
Discussion about this post