शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
महिलांना आर्थिक अडचणीवर मात करता यावी, त्यांचे प्रश्न सुटावेत याकरिता सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत साड्या, लाडकी बहीण योजनेचा दीड हजारांचा निधी, मोफत सिलिंडर या योजना म्हणजे सरकारने प्रलोभन दाखवून महिलांची दिशाभूल केली आहे. हा प्रकार म्हणजे महिलांना सक्षम करण्याऐवजी त्यांच्या हाती परावलंबी बनविण्याच्या कुबड्या दिल्याचा आरोप समाजातील जागरूक महिलांकडून जागतिक महिला दिनानिमित्त हितगुज केली असता केली आहे.
आज महिला सर्वाधिक असुरक्षित आहेत. हाथरस, स्वारगेट, मणिपूर, खैरलांजी असे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. महिला आजही सुरक्षित नाही. मंत्र्यांच्या मुलीची आज छेडखानी होत आहे. यासाठी खरंतर कायदे अधिक कडक करायला हवे. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची नितांत आवश्यकता आहे. बहुजन स्त्रियांना धार्मिकतेत अडकवले जात आहे.
— बबिता मोटघरे, माजी ग्रा.पं.सदस्या..

कोणाला मदत केली तर ती काही दिवसांपुरतीच असते. मग नंतर काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्या जागेवर महिलांना कायमस्वरूपी रोजगार दिला तर महिला आत्मनिर्भर होतील. शिवाय विनाकष्टाने कुठली मदत दिली तर त्याचे कुठलेच मोल राहत नाही. यातून उलट आळस वाढतो. अधिक गरीब महिलांना ही मदत देताना काहीशी मदत होते. मात्र, महिलांना सक्षम करण्यासाठी ही मदत पुरेशी नाही.
— पोर्णिमा चांदेवार, सरपंच..

पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या वाढत आहे. या काळात महिलांना रोजगाराच्या पुरेशा संधी अजूनही उपलब्ध नाहीत. त्या दृष्टीने सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. महिलांच्या शिक्षणासह स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सवलतही मिळायला हवी. परीक्षेसाठी भरावा लागणारा शुल्क महिलांना माफ करण्यात यावा. तरच महिला सक्षम होईल. कुटुंबाला पुढे नेता येणार आहे.
— कविता कोल्हे,ग्रा.प.सदस्या..

पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या आहे. मात्र, महिलांसाठी स्वतंत्र बजेटच नाही. केवळ महिला बालकल्याणच्या नावाखाली काही निधी येतो. हा निधी पुरेसा नाही. महिलांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यादृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. लाडकी बहीण योजना दिशाभूल करणारी आहे. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली अनेक योजना आहेत. मात्र, अंमलबजावणी तोकडी आहे.
— लिना चांदेवार,ग्रा.प.सदस्या..

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. अशा परिस्थितीत अनेक क्षेत्राचे खासगीकरण केले जात आहे. याचा फटका महिलांना बसला आहे. महिलांना केवळ दीड हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली आहे. त्या जागेवर महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न झाले असते, तर त्याचा उपयोग झाला असता. रोजगाराच्या माध्यमातून महिला घडतील अशावर भर द्यावा.
— वर्षा दोनोडे, गोंडऊमरी..

Discussion about this post